जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यासंदर्भात भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी घोषणा केल्यापासून ट्विटवर भारतीय आणि पाकिस्तानी नेटकऱ्यांमध्ये वाद सुरु आहे. इंटरनेटवर एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. दोन्ही बाजूने एकमेकांवर अगदी खालच्या थराला जाऊन टीका केली जात आहे. या सर्व गोंधळामध्ये एक युट्यूबवरचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त सोशल एक्सपिरिमेंट म्हणून अरफुद्दीन मौला या युट्यूबरचा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला असून त्याच्या या व्हिडिओचे सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे.

अरफुद्दीन युट्यूबवर ‘द फंकी एक्सप्रेस’ हे चॅनेल चालवतो. त्याने भारतीयांचे पाकिस्तानी लोकांबद्दल काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी एक सामाजिक प्रयोग (सोशल एक्सपिरिमेंट) केला. या एक्सपिरिमेंटमध्ये अरफुद्दीनने हातामध्ये ‘मी पाकिस्तानमधून आलो आहे. ‘मला मिठी मारा किंवा कानाखाली मारा’ असा फलक पकडला होता. हा फलक घेऊन तो दिल्लीमधील वेगवेगळ्या ठिकाणी उभा राहिला. एकूण आठ तास तो वेगवेगळ्या जागांवर उभा राहून लोकांना त्याला पाकिस्तानातून आल्याबद्दल कानाखाली मारण्यास किंवा मिठी मारण्यास सांगितले. यावर भारतीय कशी प्रतिक्रिया देतात हे त्याला जाणून घ्यायचे होते.

सुरुवातील काही लोकांनी त्याला मिठी मारण्याआधी थोडे विचार करताना दिसले. हातात फलक घेऊन उभ्या असणाऱ्या पांढऱ्या कुर्ता आणि पायजम्यातील तरुणाला मिठी मारायची की नाही असा विचार अनेक जण करत होते. पण हळूहळू लोकं येऊन त्याला मिठी मारु लागले. एकाही व्यक्तीने त्याला कानाखाली मारली नाही हे विशेष. तुम्हीच पाहा हा व्हिडिओ…

अरफुद्दीनच्या या व्हिडिओखाली कमेंट सेक्शनमध्ये बरीच चर्चा झाल्याचे पहायला मिळत आहे. मात्र अनेकांनी या एक्सपरिमेंटमधून भारतीय असो किंवा पाकिस्तानी माणूसकी अजूनही जिवंत आहे अशीच भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.