भीतीने थरकाप उडवण्यासाठी सिंहाची नुसती डरकाळीच पुरेशी आहे. सिंहाच्या पावलाचे नुसते ठसे दिसले तरी, लोक आपला मार्ग बदलतात. कल्पना करा, एखादा माणूस गाढ झोपेत असताना सिंह त्याच्या छातीवर बसलेला असले तर? काय अवस्था होईल त्या माणसाची. पण वास्तवात हे घडलंय, गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील अबहारमपारा गावामध्ये.

विपुल खेलाइया हा युवक त्याच्या झोपडीमध्ये झोपलेला असताना सिंहाने त्याच्यावर हल्ला केला. त्याने डोळे उघडले, तेव्हा सिंह त्याच्या छातीवर बसलेला होता. अशा प्रसंगात बहुतेकजण परिस्थितीसमोर गुडघे टेकतील. पण विपुल हिंम्मत हरला नाही. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी त्याप्रसंगी काहीतरी विशेष कृती करणे आवश्यक होते. डोळे उघडले तेव्हा, छातीवर सिंहाला पाहून विपुल सुरुवातीला थोडासा गोंधळला. पण त्याने प्रसंगावधान दाखवत मानसिक आणि शारिरीक बळ एकवटून सिंहाला अंगावरुन दूर ढकललं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

अचानक जोरदार प्रतिकार झाल्यामुळे सिंहाने सुद्धा पुन्हा हल्ला करायचे धाडस दाखवले नाही. तो पुन्हा जंगलाच्या दिशेने पळाला. “मी नैसर्गिक शिकार ठरणार नाही, हे बहुधा त्या सिंहाला कळलं असावं. त्याने भक्ष्य म्हणून माझी निवड करुन चूक केली” असे विपुल त्या भयावह रात्रीचे वर्णन करताना म्हणाला.