सध्या केरळमध्ये चीनमधून आलेली कृत्रिम अंडी विकली जात असल्याचा आरोप काही स्थानिकांनी केला आहे. इतकेच नाही तर ही अंडी फोडली आणि काही दिवस ठेवली तरी ती खराब होत नाही असा दावा त्यांनी केला आहे. ही अंडी शिजवली असता त्यांची चवही रबरासारखी असल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे काही स्थानिक आणि नेत्यांनी मिळून अनेक भागांतून आणि सुपर मार्केटमधून ही कृत्रिम अंडी ताब्यात घेती आहेत.
या अंड्याचे कवच तुटता तुटत नाही तसेच हे अंड शिजवल्यानंतर ते अतिशय कडक आणि रबरासारखे होते असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर ही अंडी चीनमधून आली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे केरळाचे आरोग्यमंत्री केके शैलजा यांनी देखील या प्रकरणात लक्ष घातले आहे. कोणत्या भागातून या अंड्यांचा पुरवठा केला जातो याची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. पण अद्यापही या अंड्यांची विक्री थांबवण्याचे आदेश मात्र देण्यात आले नाही. या अंड्यांची लवकरच प्रयोग शाळेत चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकृतरित्या येथल्या स्थानिकांनी केलेल्या आरोपांना अद्यापही दुजोरा देण्यात आला नाही.
गेल्या काही दिवसांपासून ट्विटर आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चिनी उत्पादनावर बहिष्कार टाकण्याची मोहिम सुरू आहे.