अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्या एका पाकिस्तानी पत्रकाराला चांगलेच फटकारले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेते पत्रकार परिषदेला सामोरे गेले. त्यावेळी काश्मीरवरुन प्रश्न विचारणाऱ्या एका पत्रकाराला डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या खास शैलीत झापले.

काश्मीरमध्ये भारताकडून दडपशाही सुरु आहे असे त्या पत्रकाराला म्हणायचे होते. काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद आहे. खायला अन्न नाही. तुम्ही काश्मीरसाठी काय करु शकता? असा प्रश्न त्या पत्रकाराने विचारला. त्यावर ट्रम्प यांनी इम्रान यांच्याकडे पाहून “असे पत्रकार तुम्हाला कुठे सापडतात”? तुम्ही इम्रान खान यांच्या टीममध्ये आहात का? असा प्रतिप्रश्न केला. आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीमाध्यमांसमोर हा प्रकार घडल्याने इम्रान खान यांची चांगलीच गोची झाली. तुम्ही जो विचार करता त्या गोष्टी तुम्ही बोलत आहात. तुमच हा प्रश्न नसून हे एक विधान आहे असे ट्रम्प यांनी त्या पाकिस्तानी पत्रकाराला सुनावले.

काश्मीर मुद्दा सोडवल्यास ट्रम्प नोबेल पुरस्कारासाठी पात्र ठरु शकतात असे दुसऱ्या पत्रकाराने म्हटले. त्यावर ट्रम्प यांनी समितीने निष्पक्षपणे पुरस्कार दिला तर मला बऱ्याच गोष्टींसाठी नोबेल पुरस्कार मिळू शकतो. ते निष्पक्षपणे पुरस्कार देत नाहीत. त्यांनी ओबामांना पुरस्कार दिला होता. ट्रम्प यांनी ज्या पत्रकाराला सुनावले त्याचे पाकिस्तानात मात्र कौतुक सुरु आहे. सोशल मीडियावर त्या पत्रकाराला देशभक्त ठरवण्यात आले आहे.

डोनाल्ड ट्रम्प सध्या भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांबरोबरच्या द्विपक्षीय संबंधात संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेला पाकिस्तानची मदत हवी आहे. त्यामुळे पाकिस्तानला न दुखावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. काश्मीर प्रश्नात हस्तक्षेप करण्याची तयारी सुद्धा त्यांनी याच गोष्टीमुळे दाखवली होती. दोन्ही देशांना मान्य असेल तर आपण काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करु शकतो याचा पुनरुच्चार ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला. काश्मीरला आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानला काश्मीर प्रश्नी अमेरिकेचा हस्तक्षेप हवा आहे. पण भारताने तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप मान्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांच्यासमोरच मोदींनी हे सांगितले आहे.