स्त्री-पुरुष समानता, महिला सबलीकरण यासारख्या गंभीर विषयांवर लोकांमध्ये जागरूकता वाढण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. हिमाचल प्रदेश सरकारने मुलींसाठी एक भन्नाट योजना राबवली आहे. या योजनेमुळे मुलांप्रमाणेच मुलींचेही महत्व घरात टिकून राहिल. या योजनाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. या योजनेअंतर्गत दुकानांना मुलींचेच नाव देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ‘ऊना उत्कर्ष’ असे या योजनेचे नाव आहे. हिमाचल प्रदेशमधील ऊना गावात या योजनेस सुरुवात झाली आहे. गावातील दुकानांवर मुलींची नाव झळकवणारे ऊना हे भारतातील पहिलेच गाव असल्याचा दावा काही जणांनी केला आहे.

ऊना गावात प्रवेश करताच प्रत्येक दुकानाच्या साईनबोर्डवर मुलींचेच नाव दिसत आहे. रिया जनरल स्टोअर्स, अरोही आर्ट स्टुडिओ, सपना पिझ्झा सेंटर, पिंकी रेस्टॉरंट, राणा वॉशिंग सेंटर, नाजिया शूज एंड चप्पल हाउस, नवदुर्गा मेन्स सलून, पल्लवी वशिष्ट ऑटो केअर यासारख्या असंख्या नावांच्या दुकानांवर पाट्या पहायला मिळतात.

गावातील दुकानांच्या पाट्यांवर आपलं नाव पाहून मुलींचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. या योजनेची सुरूवात झाली त्यावेळी गावकऱ्यांनी त्याला विरोध दर्शवला होता. मात्र, त्यानंतर गावकऱ्यांनी एकमतांने दुकानाच्या पाट्यावर मुलींचे नाव टाकायचे ठरवले. आधी मुलींची नावे अशी जगजाहीर करण्यास अनेक पालकांनी विरोध दर्शवला होता. पण नंतर त्याचे महत्व त्यांना पटवून सांगितले. त्यानंतर हळूहळू सर्वजण तयार होऊ लागले, असे येथील महिला आणि बाल विकास विभागाचे जिल्हा अधिकारी सतनाम सिंह यांनी सांगितले.