स्वातंत्र्यदिनाला सर्व सरकारी कार्यालयांवर तसेच शाळा-महाविद्यालये, विविध संस्थामध्ये ध्वजवंदनाचा कार्यक्रम असतो. यातील बहुतांश ठिकाणी फडकविण्यात येणारा तिरंगा कुठे तयार होतो माहितीये? नाही ना? तर कर्नाटकच्या उत्तर भागातील एका लहानशा खेड्यातील लोक हा तिरंगा तयार करण्याच्या कामात स्वातंत्र्यदिनाच्या आधीचे काही महिने व्यग्र असतात. बगलकोट शहरातील तुलसीगेरी याठिकाणी हे ध्वज तयार होतात.

मागील अनेक वर्षांपासून खादी संघातील लोक या गावात ध्वज तयार करण्याचे काम करत आहेत. ध्वज तयार करण्याचे कापड हुबळीतील बेंगेरी येथील कर्नाटका खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ येथून आणण्यात येते. हे केंद्र ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड’ने मान्यता दिलेले केंद्र आहे. या केंद्राची स्थापना १९५७ मध्ये स्वातंत्र्यसेनानी व्यंकटेश मगदी यांनी केली. खादीला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळावी यासाठी विविध खादी संघ या केंद्राला जोडले जातील यासाठी त्यांनी प्रयत्न केले. २००६ पासून या केंद्रातून देशभरात तिरंगा ध्वजाचा पुरवठा केला जातो असं ‘द हिंदू’नं म्हटलं आहे.

ध्वजाला वापरण्यात येणारे खादीचे कापड तुलसीगेरी येथून निघाल्यानंतर डायसाठी आणि स्क्रीन पेंटींगसाठी अनेक ठिकाणी जाते. प्रत्यक्ष तिरंगा हातात येण्यासाठी त्याला अनेक टप्प्यांतून जावे लागते. शिवणकाम करणाऱ्या मुख्य कारागिराने या कापडाचे वेगवेगळ्या आकारात कटींग केल्यानंतर इतर कारागिर मुख्यतः महिला ध्वजातील तीन रंग सोबत शिवतात. यामधील सर्व मापे योग्य तीच असली पाहिजेत याची विशेष काळजी घेतली जाते. लालकिल्ला, राष्ट्रपतीभवन, विधानभवन आणि इतर सरकारी कार्यालयांवर तिरंगा फडकविण्यात येतो. हा तिरंगा आपण शिवलेला असल्याने तुलसीगेरी आणि बेंगेरी येथील कारागिरांसाठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.