‘वंदे मातरम्’ वरून देशभरात वाद सुरू असताना वडोदराच्या मुस्लिम बांधवानी मात्र राष्ट्रगीत गाऊन सगळ्यांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

गेल्याच महिन्यात तामिळनाडूतील प्रत्येक शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये वंदे मातरम् गायलाच हवं. आठवड्यातून किमान एकदा तरी हे राष्ट्रीय गीत गायला हवं, असा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशानंतर प्रत्येक राज्यात वंदे मातरम् गाण्याची सक्ती करावी अशी मागणी अनेक राजकारण्यांनी लावून धरली. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. हा वाद ताजा असतानाच वडोदरामधल्या मुस्लिम मौलवींनी मात्र एक वेगळीच भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय गीतावरून वाद सुरू असताना या मुस्लिम मौलवींनी एकत्र येऊन राष्ट्रगीत गायलं आहे. भारताच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी एकत्र येऊन जन- गण- मन गाऊन एक वेगळीच भेट दिली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकीकडे राष्ट्रीय गीताच्या सक्तीवरून वातावरण तापलं असताना मुस्लिम बांधवांनी मात्र आपल्या कृतीतून सर्वांची मनं जिंकलीत. हा वाद फक्त धर्मापूरता मर्यादित ठेवून त्याचं राजकारण करण्यापेक्षा आपण सारे एक आहोत हेच त्यांनी दाखवून दिलं आहे.

दरम्यान, मुंबईतील भाजप नगरसेवक संदीप पटेल यांनी देखील महापालिका आणि सर्व अनुदानित शाळांमध्ये वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत गाणं अनिवार्य करण्यात यावं यासाठी प्रस्ताव मांडला. मात्र या प्रस्तावाला काँग्रेस, मनसे, एमआयएम आणि समाजवादी पक्षाने तीव्र विरोध केला. त्यातून समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी देखील आपण वंदे मातरम् म्हणणार नाही अस म्हणत हा वाद आणखीणच वाढवला. त्यामुळे देशात ‘वंदे मातरम्’च्या सक्तीवरून वाद पेट असताना, वडोदरामधल्या मुस्लिम मौलविंनी मात्र एक वेगळीच भूमिका घेतली आहे.