सध्या व्हायरल होत असलेला राष्ट्रगीतांचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाय का? नसेल पाहिला तर नक्की पाहा. भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशांचे राष्ट्रगीत अतिशय सुंदर पद्धतीने एकत्रित गायल्याचा हा व्हिडिओ आहे. तो पाहून आणि ऐकून तुम्हाला नक्कीच छान वाटेल. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी अशी संबंधित देशांतील नागरिकांची भावना आहे. यासाठी अनेकदा विविध स्तरावर प्रयत्नही करण्यात आले आहेत. मात्र दहशतवादी कारवायांमुळे हे प्रयत्न वारंवार अयशस्वी होत असल्याचे आपल्याला दिसते. त्यावर मार्ग काढण्यासाठी दोन्ही देशांतील तरुणांनी पुढाकार घेतला आहे.

पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन १४ ऑगस्ट रोजी असतो तर भारताचा १५ ऑगस्ट रोजी. दोन्ही देशांना स्वातंत्र्य मिळून यंदा ७० वर्षे पूर्ण झाली आहेत. आता अशाप्रकारे एकत्रित राष्ट्रगीत कोणी गायले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ‘व्हॉईस ऑफ राम’ नावाच्या ग्रुपमधील दोन्ही देशांच्या सीमेवर राहणाऱ्या तरुणांनी एकत्र येऊन ही राष्ट्रगीते म्हटली आहेत.

यानिमित्ताने तरी दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. आपण आपल्या कलेच्या सीमा विस्तारतो तेव्हा त्यासोबत नकळत शांतता प्रस्थापित होते. त्यामुळे या एकत्रितरित्या गायलेल्या राष्ट्रगीतांना ‘शांतता गीत’ असे नावही देण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी आपल्यातील वाद दूर सारले आणि एकत्र यायला हवे. तसे झाल्यास नक्कीच जादू होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ आहे असे म्हणता येईल.