संपूर्ण जगाचे लक्ष्य लागून राहिलेल्या ‘चांद्रयान-२’चे सोमवारी भारताने यशस्वी प्रक्षेपण केले. सोमवारी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील तळावरुन चांद्रयान-२ अवकाशात झेपावले. जीएसएलव्हीएमके३-एम१ प्रक्षेपकाने चांद्रयान-२ ला पृथ्वीच्या कक्षेत सोडले. पुढील ४८ दिवसात हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. मात्र भारताने हे ‘चांद्रयान-२’ अवकाशात सोडल्याने ऑस्ट्रेलियातील नागरिक मात्र गोंधळात पडले.

झालं असं की भारताने २ वाजून ४३ मिनिटांनी ‘चांद्रयान-२’चे प्रक्षेपण केलं त्यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये संध्याकाळचे साडेसात वाजले होते. याच वेळी ऑस्ट्रेलियातील अनेकांना आकाशामध्ये चमकणारा प्रकाश दिसला. ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील भागातून तसेच क्विन्सलॅण्ड परिसरातील नागरिकांना हा विचित्र प्रकाश दिसल्याने आश्चर्याचा धक्काच बसला. अनेकांनी हा प्रकाश म्हणजे उडती तबकडी वगैरे असल्याची शक्यता व्यक्त केली.

वायव्य क्विन्सलॅण्डमधील ज्युलिया खाडी परिसरातील कार्वान पार्क येथून शॉना रॉयस हिला आकाशामध्ये साडेसातच्या सुमारात चमकणाऱ्या काही रेषा दिसल्या. तिने यासंदर्भात एबीसी नॉर्थ वेस्ट या वृत्तवाहिनीच्या फेसबुकपेजवर पोस्ट केले. याच उजेडाबद्दल बोलताना मॅकिन्ले शेयर परिसरातील स्थानिक नेत्याने दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळच्या सुमारास एका सामाजिक उपक्रमासाठी पैसे गोळा करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या डिनर पार्टी दरम्यान आकाशात चमकणारा उजेड दिसला. यावेळेस आम्ही १६० जण उपस्थित होतो असंही या नेत्याने सांगितले. ‘हा प्रकाश खूपच स्पष्टपणे दिसत होता. या प्रकाशमान गोष्टीला शेपटी असल्यासारखा तो प्रकाश दिसत होता. ही वस्तू ईशान्य दिशेला जाताना दिसली. जवळ जवळ तीन ते चार मिनिटे हा उजेड आकाशात दिसत होता. त्यानंतर तो दिसेनासा झाला. ही वस्तू नक्की काय होती याबद्दल आम्हाला काहीच कल्पना नव्हती. असा उजेड आकाशात दिसणे खरोखरच अनपेक्षित आहे,’ असं या नेत्याने सांगितले.

जेकॉब ब्लंट या व्यक्तीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. ‘आकाशात आज हा विचित्र प्रकाश दिसला’ या कॅप्शनसहीत हा व्हिडिओ जेकॉबने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जेकॉब ‘ते पाहा, ते पाहा… हे एलियन किंवा युफओ आहे’ असं ओरडताना ऐकू येत आहे. ‘मला ती गोष्ट युएफओ असल्यासारखं वाटलं म्हणून मी त्याचे व्हिडिओ शुटींग केलं’ असं जेकॉबने एबीसी नॉर्थ वेस्टच्या फेसबुक पेजवर नंतर पोस्ट केलं. एसीबी नॉर्थ वेस्टनेही आपल्या फेसबुक पेजवरुन हा प्रकाश म्हणजे भारताने अवकाशात प्रक्षेपित केलेल्या ‘चांद्रयान-२’चा असल्याचे म्हटले आहे.

मात्र ऑस्ट्रेलियातील काही भागांमध्ये खळबळ उडवून देणारा हा प्रकाश म्हणजे कोणत्याही प्रकारचे परग्रही किंवा उडती तबकडी नव्हती तर तो उडेज म्हणजे भारताने चंद्राकडे घेतलेली झेप होती. म्हणजेच भारताचे चांद्रयान अवकाशात झेपावल्यानंतर ते ऑस्ट्रेलियातील लोकांना दिसले.

हे कसं झालं

भारत आणि सिडनीमधील स्थानिक वेळेत पाच तासांचा फरक आहे. म्हणजेच भारतामध्ये जेव्हा दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान अवकाशात झेपावले तेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये रात्र होती. प्रक्षेपणानंतर पृथ्वीच्या कक्षेत यान स्थिर होण्यासाठी १६ मिनिटांचा अवधी लागला. आता खालील फोटोमध्ये इस्रोने दिलेला चांद्रयान २ चा मार्ग पाहा. चांद्रयान २ अवकाशात झेपावल्यानंतर त्याचा प्रवास दक्षिणेकडे सुरु झाला. (फोटोच्या डाव्या कोपऱ्यात श्रीलंका दिसत आहे) त्यामुळेच भारताने प्रक्षेपित केलेलं चांद्रयान हे दक्षिण गोलार्धातून म्हणजेच ऑस्ट्रेलियावरुनही गेल्याचे स्पष्ट होते. त्यामुळेच तेथील लोकांना आकाशामध्ये प्रकाशमान रेषा दिसल्या.

चांद्रयान २ चा मार्ग

पुढील ४८ दिवसांमध्ये भारताचे हे चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. चंद्रावर यान उतरवणारा भारत हा जगातील केवळ चौथा देश ठरणार आहे. याआधी अमेरिका, रशिया आणि चीनने हा पराक्रम केला आहे.