करोना महामारीचं संकट असतानाही सलग चौथ्या वर्षी फिनलँड हा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. संयुक्त राष्ट्राकडून शुक्रवारी जगातील सर्वात आनंदी देशांची यादी( Worlds Happiest Countries Report) जारी करण्यात आली. यानुसार फिनलँड पुन्हा एकदा जगातील सर्वात सुखी देश ठरला आहे.
संयुक्त राष्ट्राकडून जारी करण्यात आलेल्या या यादीत १४९ देशांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांपेक्षाही खाली आहे. १४९ देशांच्या यादीत भारताला १३९ क्रमांक मिळालाय. ही यादी जाहीर करताना देशाची जीडीपी, सामाजिक सुरक्षा, व्यक्तिगत स्वातंत्र्य, भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर पश्न विचारले जाऊन हॅपीनेस स्कोर तयार केला जातो. यानुसार पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ या देशांमधील नागरिक भारतीय नागरिकांपेक्षा जास्त आनंदी आहेत.
चीन या यादीत ८४ व्या स्थानी, पाकिस्तान १०५ , नेपाळ ८७ व्या स्थानी तर बांगलादेश आणि श्रीलंका अनुक्रमे १०१ आणि १२९ व्या स्थानी आहे. फिनलँडने पहिला क्रमांक पटकावला असून फिनलँडच्या खालोखाल डेन्मार्क दुसऱ्या स्थानावर आहे. तर, स्वित्झर्लंड, आईसलँड आणि नेदरलँड या देशांनी अनुक्रमे तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक मिळवलाय. जगातील सर्वात श्रीमंत देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेलाही या यादीत पहिल्या १० देशांमध्ये स्थान मिळालेलं नाही. जगातील सर्वात आनंदी देशांमध्ये अमेरिकेचा १९ वा क्रमांक आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 20, 2021 9:46 am