भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या तिसरा कसोटी सामना सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे हा सामना सुरु असून भारताच्या कामगिरीबाबत क्रिकेटप्रेमी खूश नाहीत. याचे उदाहरण म्हणजे चेतेश्वर पुजारा याच्या कामगिरीवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असल्याचे दिसते. तिसऱ्या कसोटीमध्ये पहिली धाव काढण्यासाठी पुजाराने एक, दोन नाही तर तब्बल ५० चेंडू खर्ची घातले आहेत. त्याच्या या कामगिरीवरुन नेटकऱ्यांनी त्याच्यावर चांगलीच टिका केली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजारा भारताकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. जोहान्सबर्ग कसोटीत सलामीचे दोन फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताचा डाव सावरण्याच्या दृष्टीकोनातून पुजाराने पहिल्या सत्रात चिवट खेळ केला. मात्र हा खेळ करताना पुजाराने आपली पहिली धाव काढण्यासाठी तब्बल ५० चेंडू खर्ची घातले. त्याची ही कुर्मगतीची खेळी ट्विटरवर चांगलाच चर्चेचा विषय बनली होती. काहींनी त्याच्या या खेळीची जोरदार खिल्ली उडवली. पुजाराकडे बहुदा आधारकार्ड नसल्यामुळे त्याला धावपट्टीवर आपल्या धावांचं खातं उघडण्यासाठी वेळ लागत असावा अशी खोचक टीकाही काही युजर्सनी केली.

विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या जोडगोळीने भारताचा डाव सावरल्यानंतर काहीकाळ भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात दणक्यात पुनरागमन केलं. विराट कोहलीने चेतेश्वर पुजाराच्या साथीने संयमी खेळी करत अर्धशतकी खेळीही केली. मात्र विराट कोहली माघारी परतल्यानंतर पुन्हा एकदा भारताचा डाव घसरला. विराटने तिसऱ्या विकेटसाठी चेतेश्वर पुजारासोबत ८७ धावांची भागीदारी केली. मात्र विराट तंबूत परतल्यानंतर भारतीय संघ पुन्हा काहीसा थंडावल्याचे दिसले. त्यामुळे भारतीय खेळाडूंची कामगिरी अशीच राहीली तर भारताचे काय होणार असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.