X

मुलीच्या शिक्षणासाठी भारतीय अब्जाधिशाने ब्रिटनमध्ये घेतला महाल

एकटीच्या दिमतीला केली १२ नोकरांची व्यवस्था

आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आई-वडिल काय करतील सांगता येत नाही. आपली मुले शिकून मोठी व्हावीत आणि त्यांनी नाव कमवावे अशी पालकांची इच्छा असते. त्यातही ते पालक आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असतील तर विचारायलाच नको. अशाच एका अब्जाधीश असलेल्या पालकांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी चक्क एक अलिशान महाल बांधला आहे, तोही स्कॉटलंडमध्ये. इतकेच नाही तर आपल्या मुलीच्या दिमतीला त्यांनी १२ नोकरही ठेवले आहेत. हे १२ नोकर त्या मुलीच्या जेवणाची, महाल स्वच्छ ठेवण्याची, माळीकाम करण्याची, वाहनचालकाची कामे करतात.

ही मुलगी स्कॉटलंडच्या सेंट अॅंड्रयुज विद्यापीठात शिकत असून हे शिक्षण ४ वर्षात पूर्ण होणार आहे. हे कुटुंब श्रीमंत असल्याने महालातील काम करणाऱ्यांना एका एजन्सीद्वारे नेमण्यात आले आहे. ते अनुभवी आणि कुशल असतील याचीही विशेष काळजी नेमणूक करताना घेण्यात आली आहे. या लोकांची नेमणूक करण्याच्या जाहिरातीत आनंदी, ऊर्जा असलेले आणि कुशल मनुष्यबळ असावे असे म्हटले जात आहे. स्वयंपाक करण्यासाठी एक जण, तो वाढण्यासाठी आणि टेबल साफ करण्यासाठी आणखी एक आणि आणखी एकाचे काम मेनू ठरवणे आणि बनविलेले पदार्थ योग्य आहेत की नाही ते तपासून पाहणे असे आहे. याशिवाय माळीकाम, वाहनचालक, दरवाजा उघडण्यासाठी, साफसफाईसाठी, इतकेच नाही तर प्रसंगी या मुलीची खरेदी करण्यासाठी या लोकांची नोमणूक करण्यात आली आहे. त्यांचे पगारही बक्कळ असून मुलीच्या शिक्षणात तिला काही कमी पडू नये हा एकच पालकांचा उद्देश असावा.

अशाप्रकारे मुलीच्या शिक्षणासाठी इतका खर्च करणारे हे पहिलेच भारतीय पालक असतील असे म्हटले जात आहे. ही मुलगी नेमकी कोणत्या विषयाचे शिक्षण घेत आहे आणि तिचे नाव काय याबाबत माहिती मिळालेली नाही. तसेच तिच्या पालकांचीही नावे समजलेली नाहीत. मात्र शिक्षणासाठी इतकी तजवीज करणारे पालक खऱ्या अर्थाने धन्यच म्हणावे लागतील.