सोशल मीडिया हे वरदान ठरत असले तरी आता हे वरदान अनेक कंपन्यांसाठी श्राप ठरत चालले आहे. सोशल मीडियामुळे एकमेकांपासून दूरावलेले जग जवळ आले आहे, एका क्लिकवर आपल्याला जगाची बित्तंमबातमी कळते पण भारतातल्या अनेक कंपन्यांसाठी आता सोशल मीडिया श्राप ठरत आहे. नुकत्याच ‘टीम लिज’ या मानवी संसाधन कंपनीने केलेल्या एका अहवालाची सध्या चर्चा होत आहे. या अहवालानुसार भारतीय कर्मचारी हे त्यांच्या कामाच्या एकूण तासांपैकी ३२ टक्के वेळ हा सोशल मीडियावर खर्च करतात. कामात लक्ष देण्यापेक्षा भारतीय कर्मचारी कार्यालयीन वेळात सोशल मीडियावर अधिक सक्रिय असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

भारतीय कर्मचारी दिवसातील अडीच तास सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यातून सर्वाधिक वेळ ते फक्त फेसबुकवर खर्च करतात असेही या अहवलात म्हटले आहे. कार्यालयीन वेळेत सोशल मीडियावर सक्रिय असणा-या कर्मचा-यांपैकी ८२ टक्के कर्मचारी हे वारंवार फेसबुकवर सक्रिय असतात. फेसबुकवर इतरांच्या अपडेट तापासून पाहणे हे काम ते करतात. कर्मचारा-यांच्या या सवयीमुळे कंपनीला जवळपास १३ टक्के नुकसान सहन करावे लागते असाही खुलासाही त्या अहवालात केला आहे. तरी अनेक कार्यालयात फेसबुक वापरण्यात बंदी घालण्यात आली आहे. पण काही कार्यालयात मात्र सोशल मीडियाच्या वापरावर कोणतेही बंधन नाही त्यामुळे अशा कंपन्याच्या उत्पादन क्षमतेवर याचा परिणाम होऊ शकते असेही म्हटले आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी याची गांभीर्याने दखल घेत आहेत.