उत्तर प्रदेशमधील किसान यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी यांच्यावर बुट फेकण्याचा प्रकार घडला. सीतापूरच्या रॅलीदरम्यान राहुल गांधी उघड्या जीपमधून गर्दीला अभिवादन करत असताना एकाने त्यांच्या दिशेने बुट भिरकवला पण सुदैवाने राहुल गांधी यांना तो बुट लागला नाही. राहुल यांच्यावर बुट फेकणा-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले पण अशा प्रकारची परिस्थिती ओढवणारे राहुल गांधी काही पहिले नाही अनेक नेत्यांच्या बाबतीत अशा दुर्दैवी घटना घडल्या आहेत.  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पी चिंदबरम, लालकृष्ण आडवाणी यांच्या बाबतीत असाच दुर्दैवी प्रकार घडला आहे.
अरविंद केजरीवाल यांच्यावर २०११ मध्ये लखनउमध्ये बुट फेकून मारण्यात आला. भष्ट्राचाराविरोधात केजरीवाल चुकीची मोहिम राबवत असल्याचे सांगत त्यांच्यावर जितेंदर पाठक यांनी बुट फेकण्याचा प्रयत्न केला. हा दुर्दैवी प्रकार केजरीवालांसोबत दुस-यांदा घडला. सम विषम वाहनाच्या प्रयोगावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देखील एकाने त्यांच्यावर बुट फेकून मारला होता.
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर देखील एका तरुणाने असाच हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण यातून सुदैवाने ते वाचले होते. अहमदाबाद येथल्या प्रचार सभेच्यावेळी मनमोहन सिंग यांच्यावर बुट फेकण्याचा प्रयत्न केला गेला पण सुदैवाने हा बुट त्यांच्यापासून काहीच दूर अंतरावर पडला.
२००९ साली अर्थमंत्री पी. चिदंबरच यांना देखील अशाच घटनेचा सामना करावा लागला. एका पत्रकारने त्यांना १९८४ च्या शिख दंगलीसंदर्भात काही प्रश्न विचारले होते. मात्र याविषयावर बोलण्यास त्यांनी टाळाटाळ करताच त्यांच्यावर भडकलेल्या पत्रकारने चप्पल फेकून मारली. भाजपाचे जेष्ठ मंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्या गाठीशीही असाच वाईट अनुभव आहे. मध्य प्रदेशमध्ये २००९ साली सभेच्या दरम्यान त्यांच्यावर लाकडी चप्पल फेकून मारण्यात आली होती.