एकाच विमानातून प्रवास करत असताना स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरानं पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावरून वेगळंच वादंग सुरू झालं. विमान कंपन्यांनी यावर आक्षेप घेत कुणाल कामराचं वर्तन चुकलं असल्याचं म्हटलं आहे. त्याला एअर इंडिया, इंडिगो, स्पाईस जेट आणि गो एअर यांनी हवाई प्रवासावर बंदी घातली आहे. कुणालवर घालण्यात आलेल्या या बंदीविरोधात सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरु आहेत. दरम्यान, कुणालने आपल्या नेहमीच्याच विनोदी शैलीत रेल्वे प्रशासनावर निशाणा साधला.

कुणालने ट्विटच्या माध्यमातून “आता भारतीय रेल्वेची वेबसाईट देखील बंद आहे. करु तर काय करु आणि बोलू तर काय बोलू” अशा मिश्किल शब्दात भारतीय रेल्वेवर टीका केली. या ट्विटला भारतीय रेल्वेने देखील कुणालच्याच शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. रेल्वे प्रशासनानं एक ट्विट करून वेबसाईट का बंद होती, याचा खुलासा केला आहे. “११.४५ ते १२.२० वाजेपर्यंत तिकीट बुक करण्यासाठी वेबसाईट बंद होती,” असं सांगत रेल्वेनं कुणालला निरूत्तर करण्याचा प्रयत्न केला आहे.

काय आहे प्रकरण?

अर्णब गोस्वामी आणि कुणाल कामरा एकाच विमानातून प्रवास करत होते. यावेळी कुणाल कामरानं गोस्वामी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्याने ट्विटही केलं होतं. “मी लखनौच्या विमानात अर्णब गोस्वामी यांना भेटलो. त्यांना मी नम्रतेनं बोलण्याची विनंती केली. पहिल्यांदा त्यांनी फोनवर बोलत असल्याचं नाटक केलं. मी त्यांचा फोन संपण्याची वाट पाहिली,” असं कुणाल कामरानं आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.