करोना संकटकाळात भारतीय रेल्वेने अनेक प्रकारच्या मदतकार्यात मोलाची भूमिका बजावली. या संकटकाळात रेल्वेने विविध माध्यमातून केलेल्या मदतीचं दर्शन घडलं. आता पुन्हा एकदा अभिमान वाटावा असं काम रेल्वेनं करून दाखवत लष्कराबरोबरच नागरिकांचं मन जिंकलं आहे. भारतीय लष्कराने केलेल्या विनंतीनंतर भारतीय रेल्वेने राजधानी एक्स्प्रेसची वेगमर्यादा ओलांडली आणि ही ट्रेन फूल्ल स्पीडमध्ये धावली. लष्कराच्या जवानांची दुसरी ट्रेन पकडण्यासाठी धावपळ होऊ नये आणि त्यांना सामानासह ट्रेनमध्ये चढण्यास योग्य वेळ मिळावा यासाठी राजधानी एक्स्प्रेसने आपला कमाल वेग गाठला. रेल्वे मंत्रालयाने ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

जवानांना नसता मिळाला वेळ –
ही घटना रांची रेल्वे डिव्हिजनमधली आहे. झारखंडच्या रामगड येथून 100 लष्करी जवानांना राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीपर्यंतचा प्रवास करायचा होता. रांचीला राजधानीचा थांबा आहे, पण रांची आणि रामगडमध्ये जास्त अंतर आहे. कमी वेळेत रामगडवरुन रांचीपर्यंतचा प्रवास करणं कठीण होतं. जवानांकडे सामानही खूप होतं, त्यामुळे धावपळ करणं त्यांना अजून त्रासदायक झालं असतं. त्यामुळे रांचीपेक्षा बरकाकाना स्टेशनला पोहोचणं जवानांसाठी सोयीस्कर होतं. हे स्टेशन रामगडच्या जवळही आहे. पण, बरकाकानाला जवान पोहोचले असते तरी राजधानी तिथे केवळ 5 मिनिटे थांबते. हे पाहून रेल्वेला विनंती करण्यात आली की, 100 जवानांना सामानासह राजधानी ट्रेनमध्ये चढण्यास वेळ लागेल त्यामुळे बरकाकाना स्टेशनवर जास्त वेळ मिळावा. पण, यासाठी अतिरिक्त वेळेची आवश्यकता होती आणि रांची रेल्वे डिव्हिजनकडे राजधानीला पाच मिनिटं अतिरिक्त थांबवण्याचे अधिकार नव्हते, त्यामुळे रांची डिव्हिजनने यावर तोडगा काढला.

फूल्ल स्पीडमध्ये राजधानी –
रेल्वे डिव्हिजनच्या ऑपरेटिंग विभागाने रणनिती करुन रांचीपासून बरकाकानापर्यंत ट्रेन वेळेआधी पोहोचवण्याची तयारी केली. त्यानुसार, राजधानी एक्स्प्रेस तिच्या सर्वात जास्त स्पीडवर पळवण्यात आली आणि बरकाकाना स्टेशनवर संध्याकाळी 7.08 वाजता पोहोचली. टाइम टेबलनुसार या गाडीचा निर्धारित वेळ 7.25 चा होता. अशाप्रकारे ज्या स्टेशनवर पाच मिनिटे गाडी थांबते तिथे जवानांना 22 मिनिटांचा वेळ मिळाला. 17 मिनिटे आधी पोहोचल्याचा जवानांना फायदा झाला आणि त्यांची दमछाक झाली नाही, तसेच धावपळही वाचली. या घटनेनंतर, “आम्हाला आमच्या सैन्य दलांच्या गरजा समजतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही नेहमीच वचनबद्ध आहोत”, असं ट्विट रेल्वे मंत्रालयाने केलं आहे.