देशभरात सध्या थंडीची लाट आली असून दिवसागणिक वाढतच चालली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्येतर तुफान बर्फवृष्टी सुरू आहे. परिणामी रस्ते आणि हवाई वाहतूक खोळंबली आहे. या तुफान बर्फवृष्टीमुळे लष्कारातील जवानाला आपल्या लग्नात पोहचता आलं नाही.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशमधील सुनिल कुमार जम्मू- काश्मीर येथे लष्कराच्या सेवेत रुजू आहे. १६ जानेवारी २०२० रोजी सुनिलचं लग्न होतं. सुनिलच्या घरच्यांनी लग्नाची सर्व तयारी केली होती. मांडपापासून ते सनई चौघड्यापर्यंत सर्व तयारी झाली होती. वधूही लग्नासाठी तयार होती..आपल्या होणाऱ्या नवऱ्याची स्वप्न पाहतं होती. पण तुफान बर्फवृष्टीमुळे सुनिलला स्वत:च्याच लग्नाला जाता आलं नाही. अतिबर्फवृष्टी झाल्यामुळे तो तिथेच अडकला आणि लग्नाचा मुहूर्त टळला.

हिमाचलमधील मंडी जिल्ह्यातील खेईर या छोट्याशा गावात राहणाऱ्या सुनिलचा १६ जानेवारी रोज विवाह होणार होता. पण, त्यासाठी तो काही वेळेवर पोहोचू शकला नाही. ‘माझ्या भावाचं लग्न १६ जानेवारीलाच होणार होतं. पण, हवामान खराब झाल्यामुळे तो पोहचू शकला नाही, अशी माहिती सुनिल कुमार यांच्या भावाने दिली.’

आज, मंगळवारी सुनिल आपल्या घरी पोहचणार आहे. याची माहिती स्वत: सुनिलने दिली आहे. वधू आणि वरपक्षाच्या कुटुंबीयांकडून लग्नाचा मुहूर्त बुधवारी ठरवला आहे.


आधी लगीन कोंढण्याचं म्हणणाऱ्या तान्हाजी यांची आठवण ही बातमी वाचून झाल्याशिवाय राहणार नाही. सैन्य दलानेही ट्विटरवरुन अशीच प्रतिकिया देत, सैन्यातील जवानांसाठी देश सर्वप्रथम नंतर जीवन त्याची वाट बघेल, असे म्हटले आहे.