भारतामध्ये नुकतीच अनेक पॉर्न वेबसाईटवर बंदी घालण्यात आली. मात्र असे असले तरी अशा वेबसाईटबद्दल भारतीयांना असणारे आकर्षण पुन्हा एकदा पॉर्नहब या वेबसाईटच्या वार्षिक अहवालामध्ये समोर आले आहे. पॉर्नहब या वेबसाईटने २०१८ सालातील साईट संदर्भातील डेटा जाहीर केला आहे. यामध्ये वेगवेगळ्या ट्रेण्ड्सचा आढावा वेबसाईटने घेतला आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार ही पॉर्न वेबसाईट पाहणाऱ्या अव्वल देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरामधून ही वेबसाईट किती पाहिली जाते, कोठून सर्वाधिक वेळा या वेबसाईटवर नेटकरी येतात, सर्वात जास्त कोणत्या विषयांबद्दल या वेबसाईटवर सर्च केले जाते अशी बरीच माहिती या अहवालामधून समोर आली आहे.

पॉर्नहबच्या अहवालानुसार २०१८ सालामध्ये वेबसाईटला एकूण ३ हजार ३५० कोटी हिट्स मिळाले आहेत. म्हणजेच २०१८ साली दर दिवशी ९ कोटी ९० लाख युझर्सने या वेबसाईटला भेट दिली. तुलनात्मक पद्धतीने सांगायचे झाल्यास, रोज या वेबसाईटवर पॉर्न पाहणाऱ्या युझर्सची संख्या ही पोलंड, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही देशांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे.

किम कार्दिशनचा १५ वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ आजही सर्वात लोकप्रिय व्हिडीओंच्या यादीमध्ये अव्वल स्थानी असल्याचे वेबसाईटने म्हटले आहे. या व्हिडीओला दर मिनिटाला ५५ व्ह्यूज मिळतात. दर मिनिटाला या वेबसाईटवर दोन तास लांबीचे व्हिडीओ पोस्ट केले जातात.

या वेबसाईटला भेट देणाऱ्यांमध्ये सर्वाधिक नेटकरी हे अमेरिकेतील आहे. दुसऱ्या स्थानावर युनायटेड किंग्डम आहे. तर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर अनुक्रमे भारत आणि जपान हे आशिया खंडातील देश असून पाचव्या स्थानावर कॅनडा आहे.

ही वेबसाईट पाहणाऱ्या एकूण युझर्सपैकी ८० टक्के वेबसाईटचे ट्रॅफिक हे अव्वल २० देशांमधून येते असेही वेबसाईटने म्हटले आहे. भारत आणि जपान वगळता एकाही आशियाई देशाचा या अव्वल २० देशांच्या यादीमध्ये समावेश नाहीय. पॉर्न पाहणाऱ्या देशांच्या यादीमध्ये कझाकिस्तानने ३३, क्युबाने २६, सिरीयाने ३१, कोलंबियाने १७ स्थानांनी आणि तुर्कीने ११ स्थाने वर उडी मारली आहे. भारतामध्ये काही महिन्यांपूर्वी पॉर्न वेबसाईटवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पुढील वर्षीच्या आकडेवारीमध्ये भारताची जागा कोणता देश घेईल हे तेव्हाच समजू शकेल.