पेट्रोल, डिझेलचे दर दररोज बदलत आहे, त्यामुळे देशातील अनेक शहरात पेट्रोलच्या दरात मोठी वाढ झालेली दिसून येते. कुठे ८० तर कुठे ७९ रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोलची विक्री होते आहे. ‘बहुत होगयी जनता पर पेट्रोल डिझेल की मार अब की बार मोदी सरकार’ अशी जाहिरातबाजी करत सत्तेत आल्यावर पेट्रोल डिझेलचे दर कमी करू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले होते. पण सध्याची परिस्थिती पाहता या बाता हवेत कधीच विरून गेल्यात असेच म्हणावे लागेल. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या भाववाढीवर तीव्र नाराजी सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच #अच्छे_दिन_का_महँगा_पेट्रोल हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे. लोकांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

वाचा : पोलीस दलातील ‘हा’ सिंघम समाजसेवेवर खर्च करतो पगारातील ४० टक्के रक्कम

आशिया खंडात इतरही देश आहेत पण त्यांच्या तुलनेत भारतात कैक पटींनी पेट्रोल, डिझेलचे भाव चढे आहेत. महाग पेट्रोल मिळणारा भारत हा आशियातला पहिल्या क्रमांकाचा देश आहे. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र आशिया खंडातील इतर देशांत पेट्रोल, डिझेलचे दर भारतापेक्षा ३० ते ४० टक्क्यांनी कमी आहेत.
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला आशिया खंडातील इतर देशांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर हे भारतीय दराच्या तुलनेत २० ते ३० रुपयांनी कमी होते. पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा दर हा ४२ रुपये प्रतिलिटर, श्रीलंकेत ५३ रुपये प्रतिलिटर, नेपाळ, भुतानमध्ये अनुक्रमे ६१ आणि ६२ रुपये प्रतिलिटर एवढा होता. तर मलेशिया, इंडोनेशियामध्ये तर पेट्रोलच्या किंमती भारताच्या तुलनेत सर्वाधिक कमी आहेत. मलेशियामध्ये सध्याच्या घडीला ३२ रुपये प्रतिलिटरच्या आसपास तर इंडोनेशियामध्ये ४० रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल मिळते.

डिझेलच्या किंमतीबाबतही ही तफावत प्रकर्षाने जाणवते. पाकिस्तान, नेपाळमध्ये डिझेलच्या किंमती या ४६ रुपये प्रतिलिटर आहेत. तर श्रीलंका, इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये गेल्या आठवड्यापर्यंत डिझेलचा दर हा ३१ ते ४३ रुपयांच्या आसपास होता. त्यामुळे हा दर पाहून मोदी सरकार विरोधात तीव्र नाराजी सोशल मीडियावर पाहायला मिळते आहे.