भारत आणि बांगलादेश सामन्यामध्ये भारतीय संघाने विजय मिळवत उपांत्यफेरीत प्रवेश केला. या सामन्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली आणि सामनावीर रोहित शर्मा यांनी प्रेक्षकांमध्ये उपस्थित असणाऱ्या ८७ वर्षांच्या आजीबाईंची भेट घेतली. सामन्यादरम्यान अनेकदा या आजीबाईंचे दर्शन झाले अन् नेटकऱ्यांबरोबर मैदानातील भारतीयही या आजीबाईंच्या प्रेमात पडले. विराट आणि रोहितला भेटून त्यांनी आशिर्वाद देत अगदी गळाभेट घेतली. मात्र या भेटीत त्यांनी विराटला काय सांगितले याबद्दलचा खुलासा एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे.

८७ वर्षांच्या चारुलता पटेल यांनी भारत बांगलादेशमध्ये रंगलेल्या संपूर्ण सामना बर्मिंगहॅम येथील एजबस्टन मैदानात उपस्थित राहून पाहिला. या आजीबाई केवळ सामन्याचा आनंदच घेत नव्हत्या तर भारतीय फलंदाजांनी चौकार, षटकार मारल्यावर लहान मुलांसारखी चक्क पिपाणी वाजवून आनंद व्यक्त करत होत्या. त्यांचा उत्साह बघून समालोचन करणाऱ्या सौरभ गांगुली व हर्षा भोगले यांनादेखील या आजीबाईंची दखल घ्यावीशी वाटली. संपूर्ण वर्ल्ड कपमधला सगळ्यात सुंदर क्षण जोकॅमेऱ्यानं टिपलाय अशा शब्दांमध्ये गांगुलीनं या आजीबाईंचं कौतुक केलं. केवळ समालोचकच नाही तर नेटकरीही या आजीबाईंच्या ‘क्युटनेस’वर फिदा झाले आहेत. दोन्ही गालांवर भारताचा झेंडा रंगवून पिपाणी वाजवणाऱ्या या आजींची झकल टिव्हीवर दाखवल्यानंतर काही क्षणांमध्ये ट्विटवर त्यांचे फोटो व्हायरल होऊ लागले. सामन्यादरम्यान इंग्लंडपासून भारतापर्यंत चर्चेचा विषय ठरलेल्या या आजींची भेट घेण्याचा मोह विराट आणि रोहितलाही आवरला नाही. सामना संपल्यानंतर विराट आणि रोहित थेट या आजीबाईंची भेट घेण्यासाठी पोहोचले. या आजीबाईंची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद देखील घेतले. आजीबाईंनी देखील विराट आणि रोहितला प्रेमाने कुरवाळत लाडाने मुकाही घेतला. यावेळी चारुलता यांनी विराटच्या कानात काहीतरी सांगितल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तुम्ही विराटला नक्की काय सांगितले असा प्रश्न चारुलता यांना या भेटीनंतर एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी ‘बेटा असाच खेळत राहा. माझे आशिर्वाद तुझ्याबरोबर आहेत,’ असं विराटला सांगितल्याचा खुलासा मुलाखतीमध्ये केला.

‘विराट आणि रोहित मला सामन्यानंतर भेटायला आले तेव्हा मला खूप छान वाटले. माझ्याशी हस्तांदोलन केले, माझ्या पाया पडले दोघेही. मी व्हिलचेअरवरुन उठू लागले तर विराटने नाही नाही आजी तुम्ही बसा असं सांगितलं. तो माझ्याशी बोलण्यासाठी खाली बसला. विराट माझ्या पाया पडला. मी त्या दोघांच्या डोक्यावर हात ठेऊन त्यांना आशिर्वाद दिला. त्यांना मिठी मारली, त्यांचा मुकाही घेतला. बेटा असेच खेळत राहा माझ्या आशिर्वाद तुमच्याबरोबर आहे असं मी त्यांना सांगितलं’ अशी प्रतिक्रिया चारुलता यांनी या भेटीची माहिती देताना दिली.