आंतरराष्ट्रीय योग दिनाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. जागतिक स्तरावर हा दिन साजरा करण्याची तयारी सुरु असून यादरम्यान भारतीयांना अभिमान वाटेल असा एक व्हिडीओ समोर आला आहे. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP) जवानांनी लडाखमध्ये अक्षरक्ष: हाडं गोठवणाऱ्या थंडीत योग करत योग दिन साजरा केला. जवानांनी तब्बल १८ हजार फुटांवर हा योग केला.

२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांमुळे संयुक्त राष्ट्र महासंघाने २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर केलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव नरेंद्र मोदींनी मांडला होता. संयुक्त राष्ट्रांनी या प्रस्तावाला मान्यता दिली होती.

शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे, असा सल्ला अनेक योगाभ्यासक देतात. रोग निवारणाच्या या पद्धतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे. संयुक्त राष्ट्राने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भारताच्या नेतृत्वाखालील १७५ देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता.

२१ जूनच का?
२१ जून रोजीचा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. भारतातील ५००० वर्ष जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते.