इंडोनेशियामध्ये भूकंप आणि त्सुनामी आल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या भूकंपामुळे हजारो लोकांची घरे उध्वस्त झाली असून यामध्ये ८०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या बेटावर १० फूट उंचीच्या लाटा आल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले. या लाटांचा जोर इतका जास्त होता की त्यामुळे पाणी इमारतींमध्ये शिरले आहे. येथील लोकांचे जीव वाचविण्यासाठी मदतकार्य वेगाने सुरु आहे. ७.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यानंतर याठिकाणी मोठ्या प्रमाणात हानी झाली. याच परिस्थितीत नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी एका २१ वर्षीय तरुणाने आपल्या प्राणाची बाजी लावली आहे. त्याने बजावलेल्या कार्याबद्दल मृत्यूनंतर हिरो म्हणून त्याचे सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. विमानातील प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी त्याने आपले प्राण दिले.

एंथोनियस गुनावन आगुंग हा पालूतील एका एअरपोर्टवर एअर ट्रॅफीक कंट्रोल टॉवरवर काम करत होता. तो काम करत असताना अचानक भूकंपाचे धक्के जाणवू लागले. त्यावेळी बाटिक एयरचे एक विमान लँड होत होते. भूकंपाचे धक्के बसत असताना त्याच्यासोबत काम करणाऱ्या सर्वांनी आपली जागा सोडली आणि ते सुरक्षित ठिकाणी गेले. मात्र आगुंग याने विमान लँड झाल्याशिवाय आपली जागा न सोडण्याचे ठरवले आणि तो जागेवर थांबून राहीला. लँड होणाऱ्या विमानाला आवश्यक त्या सूचना देण्यासाठी तो जागेवर थांबला. भूकंपाचा झटका तीव्र झाल्यावर आगुंग याने जीव वाचविण्यासाठी चौथ्या मजल्यावरुन उडी मारली.

अशाप्रकारे उडी मारल्याने त्याचा पाय मोडला आणि बाकीही दुखापती झाल्या. लगेचच त्याला विमानतळावरील रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याठिकाणी प्राथमिक उपचार झाल्यानंतर पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्याचा मृत्यू झाला. पुढील महिन्यात त्याचा वाढदिवस असून त्याच्या आधीच त्याने प्राण गमावले. मात्र आपले कर्तव्य बजावत असंख्य जणांचे प्राण वाचवून स्वत:चा जीव धोक्यात घालणाऱ्या या तरुणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच.