इंडोनेशियामध्ये शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास समुद्रात अनॅक क्रॅकोटा या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने अनेक बेटांना त्सुनामीचा तडाखा बसला. स्थानिक वेळेनुसार रात्री साडेनऊ वाजता झालेल्या या उद्रेकामुळे त्सुनामीच्या मोठ्या लाटा समुद्रात उसळल्या. या त्सुनामीचा सर्वाधिक फटका जावा व सुमात्रा बेटांदरम्यानच्या सुंदा पट्ट्याला बसला. स्फोट झाल्यानंतर अवघ्या काही क्षणांमध्येच समुद्रात उसळलेल्या उंचच उंच लाटांनी किनाऱ्यांवर धडक द्यायला सुरुवात केली. यामध्ये सर्वाधिक फटका हॉटेल आणि किनाऱ्या लगतच्या घरांना बसला आहे. या त्सुनामीच्या लटांचे तडाखे किनाऱ्याला बसण्याचे अनेक व्हिडीओ आता सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत. त्यातही एका किनाऱ्यावर एक बॅण्डचा कार्यक्रम सुरु असतानाच त्सुनामी आल्याने संपूर्ण स्टेजच लाटेत वाहून गेल्याचा व्हिडीओही समोर आला आहे.

जावा बेटांच्या पश्चिम किनाऱ्यावर असणाऱ्या तांजुंग लीसुंग बीच रिसॉर्टमध्ये ही त्सुनामीच्या लाटा धडकल्या तेव्हा ‘बॅण्ड सेव्हेन्टीन’ या बॅण्डचा परफॉर्मन्स सुरु होता. अनेकजण या कार्यक्रमाचा आनंद घेत होते. मात्र अचानकच किनाऱ्याला धडकणाऱ्या लाटांनी संपूर्ण स्टेजच वाहून नेला. समु्द्राचे पाणी सामान्यपणे स्टेज बांधलेल्या जागेपर्यंत येत नाही त्यामुळे अचानक एवढी मोठी लाट आल्याने सर्वच जण धावपळ करुन लागले.

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बॅण्डचा मुख्य गायक असणाऱ्या रफीन फजारायह याने आपल्या इन्स्ताग्राम अकाऊण्टवर यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रफीनने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तो रडताना दिसत आहे. त्याने व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार बॅण्डमधील दोन जणांबरोबरच बॅण्डमधील सहकाऱ्याबरोबरच त्याचे स्वत:ची पत्नीही अद्याप बेपत्ता आहे. आम्ही या नैसर्गिक आपत्तीमध्ये आमच्या बॅण्डला बेस गिटारिस्ट बानी आणि आमचा रोड मॅनेजर ओकी यांना गमावल्याचेही रफीनने सांगितले. तर अॅण्डी (ड्रमर), हर्मन (गिटारिस्ट) आणि युजांग (क्रु मेंबर) यांचा अद्याप शोध लागलेला नाही. तसेच माझी पत्नी डायलॅन सुखरुप सापडावी म्हणून प्रार्थना करा असं रफीन या व्हिडीओत सांगताना दिसत आहे.

आतापर्यंत त्सुनामीचा तडाखा बसलेल्या भागांमधील २८१ जणांचा मृत्यू झाला असून एक हजाराहून जास्त लोक जखमी आहेत. युद्धपातळीवर मदतकार्य सुरु असले तरी मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या त्सुनामीच्या लाटांचा जबर तडाखा किनाऱ्यांवरील शेकडो हॉटेले, घरे आणि इमारतींना बसला आहे. काही फूट उंचीच्या लाटा किनार्यावर धडकताच अनेक समुद्र किनाऱ्यांवरील घरे आणि हॉटेल उद्धवस्त झाली. या किनारपट्ट्यांवर सध्या सगळीकडे उद्ध्वस्त झालेली घरे, पडलेली हॉटेले, इतस्ततः विखुरलेले सामान असे दृश्य दिसत होते. हजारो घरे उध्वस्त झाल्यामुळे लोकं रस्त्यावर आली आहेत. तसेत जागोजागी भूस्खलन झाल्यामुळे अनेकजण अद्याप बेपत्ता असल्याचे समजते.