प्रेत पुरुन दफन विधी एकदा झाला की पुन्हा ते प्रेत बाहेर काढले जात नाही हे तुम्हालाही माहिती असेल पण जर तुम्हाला कोणी सांगितले की एक गाव असेही आहे जिथे पुरलेली प्रेतं दर तीन वर्षांनी बाहेर काढली जातात इतकेच नाही तर त्यांना नवनीन कपडे घालून सजवण्यात येते तर तुमचा या गोष्टीवर विश्वास बसेल का? ऐकायला  थोडे विचित्र वाटत असले तरी इंडोनेशीयामध्ये एक उत्सव आहे या उत्सवाच्या काळात नातेवाईक पुरलेली प्रेत बाहेर काढून त्यांना नवीन कपडे घालून तयार करतात. इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर ‘मानेने’ नावाचा सण साजरा केला जातो. या सणात पुरलेले प्रेत बाहेर काढून साफ करण्याची प्रथा आहे. इतकेच नाही तर प्रेत बाहेर काढून ते नीट साफ केले जाते, त्याला नवीन कपडे घालण्यात येतात त्यानंतर या नटवलेल्या प्रेतांसोबत त्याचे नातेवाईक फोटो देखील काढतात. 

या उत्सवाच्या काळात घराघरात लज्जतदार पदार्थांची दावत असते. घरात गोड, तिखट असे विविध पदार्थ तयार केले जातात. या पदार्थांवर घरातील मंडळी ताव मारतातच पण त्याचबरोबर शवाला देखील पदार्थांचा भोग दाखवला जातो. सुलावेसी बेटावर गेल्या कित्येक वर्षांपासून हा उत्सव साजरा केला जातो. असे म्हणतात की गेल्या १०० वर्षांहूनही अधिक काळापासून हा सण साजरा केला जातो. हा उत्सव जवळपास आठवडाभर देखील चालतो. त्यामुळे या प्रेतांना दोन तीन दिवस बाहेरच ठेवले जाते. प्रेत खराब होऊ नये यासाठी त्यांच्यावर रासायिक पदार्थांचे लेपनही केले जाते. मरणावर यांचा विश्वास नाही. मरणानंतरही त्या व्यक्तीचा जीवन प्रवास सुरू राहतो अशी या लोकांची मान्यता आहे. १९७० पर्यंत या बेटावरील लोकांचा बाहेरील जगाशी कोणताच संपर्क नव्हता.