कोणत्याही शहराची कायदा-सुव्यवस्था व गुन्हेगारांवर वचक ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस यंत्रणेची असते. अनेकदा आपण आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलीसांच्या कहाण्या ऐकत असतो. अनेकदा पोलीस अधिकाऱ्यांचं प्रेमळ रुपही आपण अनुभवतो. इंदूरच्या पलासिया पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या विनोद दीक्षित या अधिकाऱ्याने गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर सर्वांची मनं जिंकली आहेत. लॉकडाउनमध्ये पेट्रोलिंगदरम्यान भेटलेल्या एका होतकरु विद्यार्थ्याला दीक्षित आपली ड्युटी संपल्यानंतर इंग्रजी आणि गणित विषय शिकवतात. राज असं या होतकरु विद्यार्थ्याचं नाव आहे.

अवश्य वाचा – सलाम मुंबई पोलीस ! रस्त्यावर चहा विकणाऱ्या मुलाला शिक्षणासाठी केली मदत

“पेट्रोलिंग दरम्यान माझी या राजची ओळख झाली. तो मला एकदा मला म्हणाला की मलाही तुमच्यासारखं पोलीस अधिकारी व्हायचं आहे, पण मला अभ्यासासाठी शिकवणीला जाणं परवडत नाही. यानंतर मी त्याला इंग्रजी आणि गणित हे दोन विषय शिकवायला लागलो. एक दोनवेळा राजशी बोलत असताना तो हुशार असल्याचं मला जाणवलं. पण परिस्थितीमुळे त्याला शिकवणीला जाणं जमत नसल्यामुळे मी त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला.” विनोद दीक्षित ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. राजचा परिवार आर्थिकदृष्ट्या फारसा सक्षम नसल्याचंही दीक्षित यांनी सांगितलं. राजचे वडील छोटीशी खानावळ चालवतात तर आजी ही रस्त्यावर फेरीवाल्याचं काम करते.

काकांकडून मला शिकवणी मिळतेय याचा मला आनंद आहे. मी दर दिवशी त्यांच्याकडून शिकतो. रोज माझा घरचा अभ्यासही करतो. मला त्यांच्यासारखं पोलीस अधिकारी व्हायचं आहे, म्हणून मला खूप अभ्यास करायचा आहे अशी प्रतिक्रीया राजने ANI शी बोलताना दिली. दीक्षित यांचे फोटो सोशल मीडियावर व्हारयल झाल्यानंतर त्यांचं नेटीझन्सनीही कौतुक केलं.