‘चहा’ हा जणू आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. एक कटिंग घेतल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरूवातही होत नाही. टपरीवरच्या चहाचे घोट घेता घेता काही क्षण मनावरचं एखादं ओझं कुठच्या कुठे पळून जातं हेही कळतंच नाही. घोटभर गरम गरम चहानं दिवसाची सुरूवात फार भारी वगैरे होते असं आपल्याच काय पण जगभरातील निम्म्या लोकांना वाटतं. या सगळ्या चहाप्रेमींना ‘आतंरराष्ट्रीय चहा दिना’च्या International tea day शुभेच्छा!. पण, नुसतं शुभेच्छांवर थांबून काय व्हायचं नाही म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय चहाबद्दल अशा काही रंजक गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसतील. तर जाणून घेऊयात चहाबद्दल थोडक्यात.
– चहा हे पाण्यानंतर सर्वाधिक प्यायले पेय आहे.
– चहाचा शोध हा अपघातानं लागला असल्याचे संदर्भ आढळतात. इसवी सन पूर्व २७३७ मध्ये चिनी सम्राट सेन नूंग यांनी चहाचा शोध लावला. अपघातानं चहाची पानं गरम पाण्यात पडली आणि चहाचा शोध लागला.
– हल्ली टपरीवर चहा पिण्यासाठी आपण पाच ते दहा रुपये मोजतो. पण तुम्हाला एक गंमत माहितीये का? पूर्वी चहा हे सर्वात महागडे पेय होते. इतकेच नाही तर चहापावडर पूर्वी कपाटात बंद करून ठेवली जायची. त्याची चावी घरमालकीणीकडे असायची त्यामुळे चहाच्या सुरक्षतेची जबाबदारी ही पूर्णपणे तिची होती.
– आपण उठसूट कधीही चहा पित असलो तरी इंग्लडमध्ये पूर्वी चहापानाचा कार्यक्रम नेहमी ३ ते ६ मध्ये पार पाडायचा.
– चहाचं सर्वाधिक उत्पन्न हे चीनमध्ये घेतलं जायचं. यापैकी सर्वाधिक चहा ही ब्रिटनमध्ये निर्यात केला जायचा.
– युएईमध्ये सर्वाधिक चहाचं प्राशन केलं जातं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 15, 2017 12:23 pm