इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. त्यातही सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होणारी चॅलेंजेस हा तर सर्वात भन्नाट प्रकार. अगदी आईस बकेट चॅलेंजपासून ते मॅनेक्यु चॅलेंजपर्यंत अनेक चॅलेंजेस सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्याची उदाहरणे आहेत. व्हायरल होणाऱ्या चॅलेंजेसमागे कधी समाजिक संदेश देण्याचा उद्देश असतो तर कधी जागृती करण्याचा. मात्र कधी कधी व्हायरल चॅलेंजसमधील काही चॅलेंजेसचा काही अर्थच नसल्याचेही पहायला मिळते. फॉलिंग स्टार्स चॅलेंज अशापैकीच एक चॅलेंज होते. या चॅलेंजमध्ये एखाद्या सार्वजनिक ठिकाणी महागड्या वस्तू घेऊन अडखळून पडल्यासारखे फोटो अनेकांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. अशाप्रकारचे काहीही अर्थ नसणारे आणखीन एक चॅलेंज सध्या व्हायरल झाले आहे. या चॅलेंजचे नाव आहे कॉक्रोच चॅलेंज.

नाव वाचून किळसवाणे वाटणारे हे कॉक्रोच चॅलेंज सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहे. या चॅलेंजमध्ये चॅलेंज स्वीकारणाऱ्याने एक झुरळ तोंडावर ठेऊन सेल्फी काढून तो सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करणे अपेक्षित असते. ट्विटर, फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर अनेकांनी Cockroach Challenge हे दोन शब्द वापरून तोंडावर झुरळ ठेवून काढलेले सेल्फी पोस्ट केले आहेत.

कसे सुरु झाले हे चॅलेंज

म्यानमारमधील यानगाँग येथे राहणाऱ्या अॅलेक्स ऑंग या तरुणाने २० एप्रिल रोजी फेसबुकवर चेहऱ्यावर झुरळ ठेऊन काढलेला एक सेल्फी पोस्ट केला. या फोटोसोबत त्याने लिहिलेल्या कॅप्शनमध्ये ‘नवीन चॅलेंज, तुम्ही हे करु शकता का?’ असे नेटकऱ्यांना विचारले. अॅलेक्सचा हा फोटो १८ हजारहून अधिक जणांनी शेअर केला आहे.

अॅलेक्सच्या या फोटोवर कमेन्टमध्ये अनेकांनी झुरळ तोंडावर ठेऊन काढलेले सेल्फी पोस्ट करण्यास सुरुवात केली. पहा नेटकऱ्यांनी कॉकरोच चॅलेंजमध्ये पोस्ट केलेले काही फोटो…


अनेकांना हे चॅलेंज किळसवाणे वाटले असले तरी काहीजणांनी अगदी गांभीर्याने ते पुर्ण केल्याचे अॅलेक्सच्या फोटोखालील कमेंटमधून दिसून येते.