इटलीमधील ६७ वर्षीय सॅलव्हाट्रे गारौ या कलाकाराच्या “इममटेरियल स्कल्पचर”ला तब्बल १३ लाख ३३ हजारांहून अधिकची किंमत मिळाली आहे. १८ हजार ३०० डॉलर्समध्ये या कलाकृतीचा लिलाव करण्यात आलाय. आता तुम्ही म्हणाल की १३ लाखांना कलाकृती विकली गेल्याचं काय कौतुक तर जगामध्ये कोट्यावधी रुपये मोजून कलाकृती विकत घेतल्या जातात. तर इथे नमूद करण्यासाठी गोष्ट ही आहे की गारौ यांच्या ज्या कलाकृतीचा लिलाव झालाय ती अस्तित्वाच नाहीय.

ला सोनो असं या कलाकृतीचं नाव आहे. ला सोनोचा अर्थ आय एम म्हणजेच मी असा होतो. स्पेनमधील डायरिओ एएस या वृत्तपत्राशी संवाद साधताना, या कलाकृतीमध्ये काहीच नसल्याने म्हणजेच तिच्या नथिंगनेससाठी ती महत्वाची आहे, असा दावा गारौ यांनी केलाय. या कलाकृतीच्या नसण्यातच तिच्या असण्याचा अर्थ आहे असं हा शिल्पकार सांगतो. “पोकळी म्हणजे ऊर्जा असणाऱ्या रिकाम्या जागेपेक्षा वेगळं काही नसतं. तरी आपण त्याला रिकामं केलं तर त्यात काहीच शिल्लक राहत नाही, असं हिसनबर्गच्या अनिश्चिततेचा सिद्धांत सांगतो. या काही नसण्यालाही वजन (महत्व) आहे. त्यामुळेच या काहीच नसणाऱ्या कलाकृतीमध्ये एक ऊर्जा असून ती पार्टीकल्सच्या माध्यमातून पुढे म्हणजेच आपल्याकडे पाठवली जात आहे. या कलाकृतीच्या नसण्यातच तिचं अस्तित्व दडलंय,” असं गारौ यांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> राष्ट्रध्यक्षांचं Tweet Delete केल्याने ‘या’ देशाने ट्विटरवर घातली बंदी; निर्णयामुळे भारतीय कंपनीला ‘अच्छे दिन’?

इटलीमधील रिती या आर्ट हाऊसने या शिल्पाच्या विक्रीसाठी मे महिन्यापासून प्रयत्न सुरु केले होते. न्यूज आर्ट नेट डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार ही कलाकृती विकत घेणाऱ्या व्यक्तीला सुपूर्द करताना आर्ट हाऊसने त्यांच्या नियमांनुसार ही कलाकृती खासगी जागेमध्ये म्हणजेच घरात पाच बाय पाच फुटांच्या जागेत लावण्याची सूचना असणारे पत्रकही या कलाकृतीसोबत दिलं आहे. “जेव्हा मी ही कलाकृती जिला मी “इममटेरियल स्कल्पचर” असं म्हटलं होतं ती साकरण्याचा निर्णय़ घेतला तेव्हा नावाप्रमाणे ही कलाकृती असावी अशी माझी इच्छा होती,” असंही गारौ यांनी म्हटलं आहे.

नक्की  पाहा >> Viral Video : …अन् अवघ्या काही क्षणांमध्ये दरीत पडला १८० कोटींचा राष्ट्रीय महामार्ग

यापूर्वीही गारौ यांनी अशाच प्रकारचे एका शिल्पाचा लिलाव केला होता. त्या शिल्पाला त्यांनी बुद्धा इन कंटेप्लेशन असं नाव दिलं होतं. मिलानमधील पाइझा डेला स्कॅला येथे त्यांनी या कलाकृतीची विक्री केली होती.