उत्तर प्रदेशमधील दोन गावांमधील ग्रामस्थ आकाशात दिसलेल्या एका वस्तूमुळे पुरते घाबरून गेले होते. आयर्नमॅन सारखी दिसणारी ही वस्तू आकाश उडताना पाहून, गावकऱ्यांना एलियन आल्याचाच भास झाला.

या संदर्भात पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोयडा भागात शनिवारी सकाळी घडली. ग्रेटर नोयडामधील धनकौर गावात आयर्नमॅन सदृश वस्तू ग्रामस्थांना दिसली. जी की एक गॅसचा फुगा असल्याचे नंतर स्पष्ट झाले.

मात्र, या अगोदर आयर्नमॅन सदृश्य एक वस्तू आकाशात उडत असल्याचे पाहून ग्रामस्थ चांगलेच घाबरले होते. त्याना ही वस्तू म्हणजे एलियन असल्याचे वाटत होते. शेवटी आयर्नमॅन  सदृश असलेला हा गॅसचा मोठा फुगा भट्टा पारसौल गावाजवळ जमिनीवर पडल्यानंतर लोकांनी याबाबत पोलिसांना कळवले.

यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, तो गॅसचा फुगा असल्याचे उघड झाले. या फुग्याचा आकार आयर्नमॅन सारखाच होता. शिवाय, तो खाली पडल्यानंतर पाण्यामुळे हलत असल्याने लोक त्याच्या जवळ जाण्यास धजावत नव्हते. यानंतर पोलिसांनी जेव्हा या फुग्यातील गॅस बाहेर काढला तेव्हा सर्व प्रकार समोर आला व ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.