तनिष्कच्या त्या जाहिरातीला लव्ह जिहाद म्हणणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे असं परखड मत अॅडगुरु भरत दाभोळकर यांनी व्यक्त केलं आहे. तनिष्कने जी जाहिरात केली आहे ती गेल्या दशकांमधल्या ज्या चांगल्या जाहिराती आहेत त्यापैकी एक जाहिरात आहे.या विरोधात काहीही प्रोटेस्ट होणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. ‘मी ही जाहिरात केली असती तर समाधानी असतो’ असं ही जाहिरात विश्वात एक प्रतिक्रिया दिली जाते. तशीच प्रतिक्रिया मला तनिष्कच्या या जाहिरातीबाबत द्यावीशी वाटते की मी ही जाहिरात केली असती तर आनंद झाला असता. लोकांना लॉकडाउनमध्ये खूप वेळ आहे.. त्यामुळे मूर्खपणाची एक प्रतिक्रिया देऊन ही जाहिरात ट्रोल होते आहे. ही बाबत अत्यंत चुकीची आहे यामध्ये लव्ह जिहाद असं काहीही नाही. मुस्लिम कुटुंबातली सासू हिंदू सुनेचं कौतुक करते आहे यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काय आहे? असाही प्रश्न भरत दाभोळकर यांनी विचारला आहे.

सध्याच्या घडीला लॉकडाउनमध्ये लोकांकडे बराच वेळ आहे त्यामुळे ते एवढ्या चांगल्या जाहिरातीत असं काहीसं शोधत बसत आहेत. असंही दाभोळकर यांनी म्हटलं आहे. एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भरत दाभोळकर यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय आहे तनिष्कची जाहिरात?
मुस्लिम कुटुंबामध्ये लग्न करुन गेलेल्या हिंदू तरुणीसाठी तिच्या सासरचे लोकं हिंदू प्रथांप्रमाणे डोहाळे जेवण करण्याचा निर्णय घेतात असं या जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे. तनिष्कने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या मुलीप्रमाणे सुनेवर प्रेम करणाऱ्या कुटुंबामध्ये या तरुणीचे लग्न झालं आहे. सामान्यपणे ज्या गोष्टी कुटुंबामध्ये साजऱ्या होत नाहीत त्या गोष्टी केवळ तिच्यासाठी साजरा करण्याचा निर्णय कुटुंब घेतं. दोन वेगळे धर्म, परंपरा आणि संस्कृतीला मेळ या जाहिरातीमध्ये साधण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे असं कंपनीचं म्हणणं आहे. मात्र अनेकांना ही जाहिरात फारशी आवडलेली नाही. या जाहिरातीमधून लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे.

दरम्यान तनिष्कने केलेली जाहिरात ही गेल्या दशकभरातल्या अनेक चांगल्या जाहिरातींपैकी एक आहे. या जाहिरातीला लव्ह जिहादचा प्रसार करणारी जाहिरात म्हणणं मूर्खपणाचं आहे असं अॅड गुरु भरत दाभोळकर यांनी म्हटलं आहे.