इंडो तिबेटीयन पोलिस दलाच्या जवानांनी ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाची मान उंचावेल अशी कामगिरी केली आहे. ‘आयटीबीपी’च्या हिमवीरांनी १८ हजार फुट उंचीवर उणे ३० डिग्री तापमानात तिरंगा फडकवला. जवानांच्या या पराक्रमाचा व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या जवानांचे तिरंगा फडकवतानाचे व्हि़डीओ व फोटो बघून प्रत्येक भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून येईल हे नक्की!

 

भूमीवर एका जवानाच्या हातात राष्ट्रध्वज आहे. तर त्याच्याच मागे खांद्यावर बंदुक घेतलेल्या जवानांची रांग आहे. भारत माता की जय अशा घोषणा देताना जवान दिसत आहेत. सोबत वाऱ्याचा आवाज आहे. पाहताच क्षणी असे वाटते की राष्ट्रध्वजाच्या सुरक्षेसाठी हे जवान हे हातात बंदुका घेऊन तैनात आहेत. चित्र पाहून तुमच्याही अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत.

 

देशभरात ७० वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असून दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यानंतर भारताच्या लष्करी सामर्थ्य आणि संस्कृतीची झलकच राजपथावर अनुभवायला मिळाली. या सोहळ्यात दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामफोसा हे प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दिल्लीत विजय चौक येथून संचलनाला सुरुवात झाली. राजपथ, टिळक मार्ग, बहादूर शाह झफर मार्ग, नेताजी सुभाष मार्ग मार्गे लाल किल्ला येथे परेडची सांगता झाली. यात २२ राज्यांचे चित्ररथ आणि केंद्र सरकारच्या विविध विभागांचे चित्ररथ सहभागी झाले होते.