सध्या सर्वत्र पावसाचा शिडकावा होत असल्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. मात्र हा गारवा जाणवण्यापूर्वी प्रत्येकानेच वैशाख वणव्याच्या झळा सोसल्या आहेत. उन्हाचा हा तडाखा सहन करत असताना अनेक जणांना चांगले -वाईट अनुभव आले आहेत आणि त्यातल्या काही जणांनी आपले हे अनुभवही सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेअरही केले आहेत. असाच एक अनुभव चीनच्या महिलेला आला असून तिच्या अनुभवाचे काही फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.  हा अनुभव इतका नवा आणि कल्पनेच्या पलिकडचा आहे की त्याचे फोटो पाहून कोणालाही हसू फुटेल.

चीनच्या एका महिलेने काही दिवसांपूर्वी चक्क गाडीच्या बोनटवर फिशफ्राय केले आहेत. या महिलेचा फिशफ्राय करतानाचा हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत असून या फोटोच्या माध्यमातून चीनच्या तापमानातील तीव्रता दखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

बिनजोऊ येथे राहणा-या या महिलेचा हा फोटो ज्यावेळी व्हायरल झाला त्यावेळी चीनचे तापमान ४० डिग्री होते. येथे उन्हाची तीव्रता एवढी जास्त होती की कोणत्याही इंधनाशिवाय, गॅसशिवाय किंवा अन्य कोणत्याही साधनाशिवाय ही महिला चक्क गाडीच्या बोनटवर मासे फ्राय करु शकत होती. यातील तिचे काही फोटो व्हायरल झाले असून यातील एका फोटोमध्ये ती छत्री घेऊन उभी आहे आणि मासे शिजवताना दिसत आहे. तर दुस-या एका फोटोमध्ये ती फिशफ्राय करताना दिसत आहे.

दरम्यान, गाडीच्या बोनटवर फिशफ्रायचा हा फोटो व्हायरल होत असतानाच चीनमधल्या ‘पिपल्स डेलीने’ देखील ट्वीटरवर यातील काही फोटो शेअर केले आहेत. ‘पिपल्स डेली’च्या या शेअरनंतर हे फोटो प्रचंड व्हायरल होत असून त्याला मोठ्या प्रमाणावर लाईक्स मिळत आहेत.