प्रत्येक गोष्टीत थोड्या प्रमाणात का होईना पण जीव असतोच, साडेचारशे वर्षे जुन्या मंदिरातील संत बंगेन ओई म्हणाले. अन् थोड्याच वेळात शेकडो रोबो डॉगचा अंत्यसंस्कार विधी पार पडला. पारंपरिक पद्धतीनं जसे जपानी संस्कृतीत माणसांवर अंत्यसंस्कार केले जातात तसेच या रोबो डॉगवरही करण्यात आले. एखाद्या मशिनवर अंत्यसंस्कार करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. पण, ज्या रोबो डॉगवर अंत्यसंस्कार करण्यात आले ते तितकेच महत्त्वाचेही होते.

जून १९९९ मध्ये सोनी कंपनीनं आयबो हे रोबो डॉग लाँच केले. केवळ २० मिनिटांत ३ हजार रोबो डॉगची विक्रमी विक्री झाली होती. भारतीय मुल्याप्रमाणे साधरण याची किंमत होती १ लाख ३० हजारांहूनही अधिक. तरीही सोनीच्या आयबो रोबो डॉगनां मिळणारी पसंती ही अफलातून होती. वर्षभरात दीड लाखांहून अधिक रोबो डॉगची विक्री झाली होती. यावरून जपानी लोकांमध्ये या रोबो डॉगबद्दल असणाऱ्या क्रेझविषयी तुम्ही अंदाजा लावू शकता.

पण २००६ च्या दरम्यान कंपनीनं या रोबो डॉगचं उत्पादन थांबवलं. पण इतकी वर्षे उलटूनही अनेकांनी हे रोबो डॉग जपून ठेवले होते. यावर्षाच्या सुरूवातीला सोनीनं आर्टिफिशीअल इंटेलेजन्सी वापरून स्मार्ट रोबो डॉग तयार केले आहेत. तेव्हा हे १९ वर्षे जुने रोबो डॉगची विल्हेवाट लावण्याआधी टोकियोच्या कोफूकुजू मंदिरात त्यांच्यावर रितसर अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले.