17 October 2019

News Flash

बापरे! ‘ही’ कंपनी विकतेय अख्खा माणूस मावेल एवढी मोठी बॅग

जाणून घ्या या बॅगेची किंमत, फिचर्स आणि आकाराबद्दल

माणसाच्या आकाराची बॅग

सध्या शाळा, कॉलेज, एखादा क्लास किंवा अगदी ऑफिसला जाणारेही अनेकजण पाठीवरील बॅगेलाच प्राधान्य देतात. अनेक तरुण मुलांसाठी तर पिकनीकपासून ते कॉलेजपर्यंत सर्वांसाठी एकच बॅग असते. मात्र कधीतरी या बॅगमध्ये सर्व गोष्टी ठेवणे कठीण होते आणि ती छोटी वाटू लागते. त्यातही आता आलेल्या लहान आकारांच्या बँगांमध्ये दोन तीन गोष्टी ठेवल्या की ती भरते. असं असतानाच जपानमधील एका कंपनीने चक्क माणसाच्या आकाराची बॅग बाजारात आणली असून या सर्व बॅग हातोहात विकल्या गेल्या आहेत.

नवीन वर्षाची एकदम दमदार सुरुवात झाली आहे. अगदी मनोरंजन, राजकारण, क्रीडा सर्वच क्षेत्रामधील अनेक महत्वपूर्ण घडामोडी पहिल्या काही दिवसांमध्येच घडल्या आणि वर्षभरातही घडत राहतील. असं असताना मग फॅशन क्षेत्र कसे यामध्ये मागे राहणार. या वर्षीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये इंटरनेटवर चर्चा रंगली ती जपानमधील पॉलीवूड या कंपनीने बाजारात आणलेल्या ह्यूमन साईज बॅगपॅकची. हा भल्यामोठ्या बॅगचे फोटो इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या बॅगची किंमत आहे २३४ डॉलर म्हणजेच १६ हजार ३८० रुपये. १८० लीटरची क्षमता असणाऱ्या या बॅगची उंची १०० सेंटीमीटर इतकी आहे. फिकट तपकिरी, ऑलिव्ह आणि काळा अशा तीन रंगांमध्ये ही बॅग उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

ही बॅग पहायला मजेशीर वाटत असली तरी ती वापरणे थोडे कष्टाचे आहे. म्हणजे ही बॅग पूर्ण क्षमतेने भरल्यास ती पाठीवर नेणे कठीण जाते आणि ती ओढतच न्यावी लागते असं काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी बॅग बनवणाऱ्या कंपनीने मात्र ही बॅग डोंगराळ भागात किंवा जंगलामध्ये कॅम्पला जाण्यासाठी अगदी योग्य असल्याचे म्हटले आहे. तसेच या बॅगचे पट्टे अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहेत की बॅग भरुन ती खांद्यावर घेतल्यानंतर तिचा सर्व भार खांद्यावर न येता तो पाठीवर येतो. या डिझाइनमुळे ही बॅग प्रवासादरम्यान आरामात वापरता येते असे कंपनीचे म्हणणे आहे.

कंपनीच्या मते ही बॅग प्रवासासाठी वापरणे सोयीस्कर असल्याचे सांगितले जात आहे तरी या बॅगचे वजन १ किलो ६०० ग्राम इतके आहे. त्यामुळे आता खरोखरच ही दीड किलोहून अधिक वजनाची बॅग घेऊन ट्रेकिंगला जाणे शक्य नसल्याचे उघड आहे. तरी अनेकांनी या बॅग विकत घेतल्या असून त्या लगेचच आऊट ऑफ स्टॉक झाल्या आहेत.

First Published on January 10, 2019 4:46 pm

Web Title: japanese brand is selling human sized backpacks