हातावरच्या रेषा भाग्य ठरवतात अशी समजूत आहे. प्रत्येकजण या रेषा घेऊनच जन्माला येतो. त्यातली एखादी रेषा अशी आहे, तशी आहे, यामुळे अनेकजण डोक्याला हात लावून बसतात. आणि ठिकठिकाणच्या ज्योतिषांच्या पायऱ्या झिजवतात. लोकांच्या मनातल्या भीतीचा असुरक्षिततेचा फायदा घ्यायला टपलेल्या या सगळ्या बुवा बाबांची तर मग चांदीच. काही करून कसं समोरच्याला नाडायचं याची मग स्पर्धाच लागते.

भारतीय समाजातलं हे एक काॅमन दृष्य असलं तरी पुढारलेल्या देशांमध्येही अशी स्थिती असेल यावर सहसा कोणाचा विश्वास बसणार नाही. जपानसारख्या  विकसित देशात असं होण्याची सुतराम शक्यता वाटत नसताना याबाबतीतही जपान पुढारलेला असल्याचं विचित्र दृष्य़ पहायला मिळतंय.

वाचा- आता ‘ट्विटर ट्रोल्स’ना बसणार तडी

हातांच्या रेषांबाबत जपानमधले लोक एक पायरी पुढे गेलेत. आपल्या हातावरच्या रेषा आपल्याला हव्या तशा करता येण्यासाठी हे लोक चक्क त्यांच्या हातावर प्लॅस्टिक सर्जरी करत आहेत.

जपानची राजधानी टोकिओमधल्या ‘शोनान ब्युटी क्लिनिक’मध्ये ही प्लॅस्टिक सर्जरी होते. हातावरच्या या नव्या भाग्यरेषा बनवण्यासाठी हाताची त्वचा लेझरच्या साहाय्याने जाळली जाते! तसंच डाॅक्टर आॅपरेशनसाठी वापरतात ती सुरीही या प्लॅस्टिक सर्जरीसाठी वापरली जाते. ही सगळी प्रक्रिया भयानक वाटत असली तरी हा नव्या ‘भाग्यरेषा’ कायमस्वरूपी राहाव्यात यासाठी हे सगळं आवश्यक असल्याचं सांगतात. आणि हे सगळं करायला खर्च किती? १ हजार डाॅलर!

म्हणजे १५ मिनिटात आपलं भाग्य बदलायला आपला हात (आणि खिसा) असा जाळावा लागतो.

या क्लिनिकमध्ये येणारे लोक मुख्यत: आपलं लग्न व्यवस्थित व्हावं, आपल्याला सफलता मिळावी, आपल्याला प्रसिध्दी आणि पैसा मिळावा यासाठी १ हजार डाॅलर्स (७० हजार रूपये) खर्च करत ही सर्जरी करून घेत आहेत.

अरे त्यापेक्षा एका चांगल्या डिग्रीच्या फीसाठी हे पैसे भरा ना!