भारतामध्ये ट्रेन वेळेवर येणे आणि वेळेवर सुटणे म्हणजे काल्पनिक गोष्ट असल्यासारखीच स्थिती आहे. मात्र, जपानमध्ये याच्या अगदी उलट चित्र दिसून येते. जपानमधील ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो. अधिकारी आणि मोटरमनला प्रत्येक सेकंदाचा हिशोब द्यावा लागतो. म्हणूनच नुकत्याच समोर आलेल्या एका प्रकरणात ट्रेन अवघ्या २० सेकंद आधी स्थानकावरून सुटल्याने प्रशासनाला माफी मागावी लागली.
भारतात ट्रेनच्या वेळापत्रकात बदल होणे, ही खूपच सामान्य गोष्ट आहे. मात्र, जपानमध्ये ट्रेनच्या वेळापत्रकात केवळ २० सेकंदांचा फरक पडल्यामुळे मोठी चर्चा रंगली आहे.

त्याचे झाले असे की, टोकियो आणि त्याच्या उत्तरेकडील उपनगरांना जोडणारी सुकुबा एक्सप्रेस ही ट्रेन मिनामी नगरेयामा स्थानकावरून नियोजित ९ वाजून ४४ मिनिटे ४० सेकंदांनी सुटण्याऐवजी ९ वाजून ४४ मिनिटे २० सेकंदालाचा सुटली.

सुकुबा एक्सप्रेस चालवणाऱ्या कंपनीने याबद्दल एक माफीनामाच जाहीर केला आहे. प्रवाशांना आमच्यामुळे झालेल्या तसदीबद्दल आम्ही माफी मागत आहोत, असे या माफीनाम्यात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात कोणीही कंपनीकडे कोणतीही तक्रार केलेली नाही. ही एक्स्प्रेस सुटली तेव्हा सर्व प्रवासी वेळेत गाडीमध्ये दाखल झाले होते. मात्र, तरीही कंपनीने आपल्या चुकीची नैतिक जबाबदारी स्विकारली. जपानमधील ट्रेन्स त्यांच्या नियोजनबद्ध वेळापत्रकासाठी जगप्रसिद्ध आहेत. तेथे ट्रेन एक सेंकद उशीरा पोहचली तरी मोटरमन्सला त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागते.