उत्तर प्रदेशातील झाशी येथे एका ओपन जीममध्ये भूत व्यायाम करत असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. जीमचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता, ज्यामध्ये मशीन कोणीही आजुबाजूला नसता आपोआप हालचाल करत असल्याचं दिसत आहे. पोलिसांनी या व्हायरल व्हिडीओची दखल घेत घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी नेमकं काय झालं होतं याचं कारण सांगितलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणीतरी थट्टा करण्यासाठी शोल्डर प्रेस मशीनला जास्त ग्रीस लावलं होतं. ज्यामुळे मशीन आपोआप वर खाली हालचाल करत होती असं सांगितलं आहे. झाशी पोलिसांनी ट्विट करत, येथे कोणतंही भूत नसून ही फक्त एक अफवा असल्याचं म्हटलं आहे.

पोलिसांनी ट्विट करताना सांगितलं आहे , “प्रमाणापेक्षा जास्त ग्रीस लावल्यानंतर मशीन काही वेळासाठी हलत राहतं. कोणीतरी मुद्दामून व्हिडीओ शूट करत सोशल मीडियावर टाकला होता. आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत. येथे कोणतंही भूत नाही”.

लोकांना खात्री पटावी यासाठी पोलिसांनी तिथे पोहोचल्यावर व्हिडीओ शूट केला असून ट्विटरला शेअर केला आहे.