‘कभी-कभी लगता है अपुन ही भगवान है’ नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’मधील नवाज़ुद्दीन सिद्दीकी उर्फ गणेश गायतोंडेचा हा डायलॉग. विश्वचषकाच्या अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवणाऱ्या अंतिम सामन्यात इंग्लंड जिंकल्यानंतर सुपर ओव्हर टाकणाऱ्या जोफ्रा आर्चरसाठी हाच डायलॉग सोशल मीडियावर वापरला जातोय. याला कारणही तसंच आहे. कारण जवळपास चार वर्षांपूर्वी आर्चरने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन जे काही ट्वीट केले होते ते अगदी तंतोतंत अंतिम सामन्याचं कथानक मांडणारे होते.

अंतिम सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्याचं स्पष्ट झाल्यानंतर इंग्लंडच्या कसोटी संघातील हुकमी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने केलेल्या एका ट्विटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. आर्चर सुपर ओव्हर टाकणार हे जाहीर झाल्यानंतर लगेचेच ब्रॉडने, तुझी इच्छा पूर्ण करण्याची संधी आहे असं ट्विट केलं. आर्चरने चार वर्षांपूर्वी सुपर ओव्हर टाकायलाही आवडेल असं ट्विट केलं होतं. त्याचं हेच ट्विट ब्रॉडने शोधलं. त्यानंतर नेटकऱ्यांचं लक्ष आर्चरच्या इतर ट्विट्सकडे गेलं. त्याने केलेल्या ट्विटमध्ये 6 चेंडूंत 16 धावा , लॉर्ड्सवर जाण्याची इच्छा, सुपर ओव्हर टाकायलाही आवडेल असे काही ट्विट होते. त्यामुळे नेटकरी जोफ्रा आर्चरला ज्योतिषाचार्य म्हणून संबोधत आहेत.


14 एप्रिल 2013 रोजी आर्चरने 16 धावा आणि 6 चेंडू असं ट्विट केलं होतं.


29 मे 2014 रोजी लॉर्ड्समध्ये खेळण्याची इच्छा आहे असं ट्विट केलं होतं.


सुपर ओव्हर टाकायलाही काहीच अडचण नाही असं ट्विट आर्चरने 5 जुलै 2015 रोजी केलं होतं.


यापूर्वी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यातही आर्चरचे आधीचे काही ट्विट्स व्हायरल झाले होते. त्यात त्यानं सातत्यानं पाऊस पडणार असल्याची भविष्यवाणी केली होती.