दररोज तीन ते चार हजार पोपटांना खाऊ घालणारे चेन्नईचे जोसेफ शेखर हे या परिसरात बर्डमॅन म्हणूनच ओळखले जातात. आपल्या इमारतीच्या छतावर त्यांनी पोपटांसाठी एक विशिष्ट आकाराची रचना करुन घेतली आहे. तिथे हजारो पोपटांसाठी ते भिजवलेले तांदूळ आणि धान्य न चुकता ठेवतात. दरदिवशी धान्य खाण्यासाठी तीन ते चार हजार पोपट कधीकधी तर आठ हजारांहून अधिक पोपट येथे येत असल्याचं ते मोठ्या कौतुकानं सांगतात.

जोसेफ २५ वर्षांपासून चैन्नईत राहात आहेत. येथे ते कॅमेरा दुरुस्तीचं काम करतात. यातून जितके पैसे मिळतात त्यातली ४० टक्के रक्कम ते या पोपटांसाठी खर्च करतात. २०१५ मध्ये चैन्नईत झालेल्या तत्सुनामीत एका दुर्मिळ जातीच्या पोपटाची जोडी त्यांच्या घरी चुकून आली होती. जखमी अवस्थेत असल्यानं जोसेफ यांनी पोपटांची काळजी घेतली. त्यानंतर या पक्ष्यांसाठी ते रोज खाद्य बाजूला ठेवू लागले. सुरूवातीला एकच जोडी होती पण नंतर मात्र एक एक करून शेकडो पोपट खाण्याच्या शोधत आपल्या इमारतीच्या परिसरात घिरट्या घालू लागल्याचंही ते म्हणाले. इमारतीच्या छतावर जोसेफ यांनी लाकडाच्या फळ्या बसवल्या आहेत यावर ते दररोज सकाळी आणि संध्याकाळी पोपटांसाठी धान्य पसरवून ठेवतात. दिवसाला किमान दहा किलो धान्य त्यांना या पक्ष्यासाठी लागतं. या पक्ष्यांशिवाय आपल्याला दुसरं कोणचं नसल्याचंही ते सांगतात. इतक्या हजारो पक्ष्यांना खाऊ घालणारा हा बर्डमॅन गेल्या तीन वर्षांपासून न चुकता त्यांचं पोट भरत आहे.

(छायासौजन्य : PTI)