दलित नेता आणि गुजरातमधील वडगामचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी यांच्या संमेलनावर पत्रकारांनी बहिष्कार टाकला आहे. चेन्नई येथे एका कार्यक्रमासाठी मेवाणी उपस्थित होते. त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर काही पत्रकारांनी त्यांना सध्या सुरु असलेल्या घडामोडींवर भाष्य करण्यासाठी विचारणा केली. यावेळी रिपब्लिक वृत्तवाहीनी या इंग्रजी माध्यमाच्या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देण्यास त्यांनी नकार दिल्याने सर्व पत्रकारांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला आहे. मेवाणी यांनी नुकतीच आपल्या जिवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली होती. त्याविषयी पत्रकारांना त्यांना प्रश्न विचारायचे होते. भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आपल्या हत्येचा कट करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

मेवाणी यांची बाईट घेण्यासाठी पत्रकारांनी मायक्रोफोन लावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी मायक्रोफोन काढण्यास सांगितले. त्यावेळी आपल्याला सामान्य प्रश्न विचारायचे असून कोणतीही विशेष मुलाखत घ्यायची नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र तरीही त्यांनी या गोष्टीसाठी नकार दिल्याने पत्रकार चिडले आणि त्यांनी त्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. एका विशिष्ट वृत्तवाहिनीला नकार दिल्याच्या कारणावरुन सर्व पत्रकारांनी त्यांच्यावर बहिष्कार घातला. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

दरम्यान, मेवाणी यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवावी अशी मागणी काही दलित संघटना करत आहेत. या श्रेणीत आठ कमांडोंसह ११ सुरक्षा रक्षक तैनात असतात. गुजरातमधील विविध जिल्ह्यांमध्ये दलित संघटनांनी तेथील जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी निवेदन दिले आहे. काही लोक माझी हत्या करू शकतात, अशी मला भीती वाटत आहे. भाजपा आणि संघाचे लोक मला मारू शकतात अशी भिती मेवाणी यांनी नुकतीच व्यक्त केली होती.