News Flash

Jumbo ‘royal’ cake: ब्रिटनच्या राजघराण्यातील लग्नाच्या निमित्ताने तिने बनवला ‘रॉयल’ केक

स्पाँजचे थर रचून झाल्यानंतर एका सुरीच्या मदतीने तिने प्रिंस हॅरी आणि मेगन यांच्या प्रतिकृतीमधील बारकावे साकारण्यास सुरुवात केली.

छाया सौजन्य- फेसबुक

ब्रिटीश राजघराण्यात सध्या प्रिंस हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कल यांच्या लग्नाची तयारी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. या उत्साही वातावरणात फक्त इंग्लंडच नव्हे तर जगभरातील अनेकजण सहभागी झाले आहेत. प्रत्येकजण आपआपल्या परिने मेगन आणि प्रिंस हॅरीला त्यांच्या या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात व्यग्र आहेत. लग्न म्हटलं की विविध पद्धतींचे केक कापून आनंद साजरा करणं ही आता एक प्रथाच झाली आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेत प्रिंस हॅरी आणि मेगनला एका बेकरने वेगळ्याच पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

इंग्लंडमधील, वेस्ट मिडलँड्स येथे असणाऱ्या ब्राऊन हिल्स येथील लारा मॅसन या Lara Mason बेकरने एक भव्य केक बनवला आहे. तिने बनवलेला हा केक सध्या सोशल मीडियावरही बराच चर्चेत आला आहे. आपल्या कलेचा सुरेख नमुना सादर करणाऱ्या लाराचीच सध्या सर्वदूर चर्चा होत आहे.

लाराचा हा केक सर्वाधिक लक्षवेधी ठरण्याचं कारण म्हणजे तिने चक्क मेगन आणि प्रिंस हॅरीच्या प्रतिकृतीच या केकच्या माध्यमातून साकारल्या आहेत. राजघराण्यातील या भावी जोडप्याने ज्यावेळी त्यांच्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा केली होती, त्यावेळी ते ज्या रुपात माध्यमांसमोर आले होते, तोच लूक लाराने या केकच्या माध्यमातून साकारला आहे. हा अद्वितीय केक साकारण्यासाठी तिला जवळपास २५० तास म्हणजेच सहा आठवड्यांचा अवधी लागला. तिने बनवलेला हा केक पाचशे लोकांसाठी पुरेसा असून, त्यासाठी वापरण्यात आलेल्या सामग्रीचं प्रमाणंही अनेकांनाच थक्क करुन जात आहे. पंधरा किलो मैदा, ३०० अंडी, पंधरा किलो बटरचा वापर करुन केकरुपी मेगन आणि प्रिंस हॅरी साकारण्यात आले आहेत. या केकसाठी वापरण्यात आलेले स्पाँजचे लेयर ‘फूड सेफ फ्रेम्स’मध्ये ठेवण्यात आले होते. ज्यानंतर केकला आकार देतेवेळी जवळपास १० किलो व्हॅनिला बटरक्रीमच्या सहाय्याने ते एकमेकांवर रचण्यात आले.

५९२ तास, ३९,००० विटा आणि ८ कारागीर पाहा कसा उभारला राजमहाल

स्पाँजचे थर रचून झाल्यानंतर एका सुरीच्या मदतीने लाराने हॅरी आणि मेगन यांच्या प्रतिकृतीमधील बारकावे साकारण्यास सुरुवात केली. ज्यावर तिने चॉकलेट गनाश आणि आयसिंगचा वापर करत ते अधिक उठावरदार बनवले. मेगनच्या पापण्यांपासून ते प्रिंस हॅरीच्या दाढीच्या रंगापर्यंत प्रत्येक गोष्टीत तिने बारकावे टीपत हा केक बनवला आहे. ‘मिरर ऑनलाइन’शी संवाद साधताना लाराने या केकविषयी आपली प्रतिक्रिया दिली. ‘हा केक बनवल्याचं पाहून मलाच माझा गर्व वाटतोय. मी आतापर्यंत बनवलेला हा सर्वाधिक उंच केक आहे. प्रिंस हॅरीची उंची ६ फूट २ इंच इतकी आहे. त्यामुळे सहाजिकच या केकचीही उंची तितकीच असणं अपेक्षित होतं. प्रत्येक वेळी मी काही आव्हानं स्वत:समोर ठेवते तेव्हा त्यातून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात’, असं ती म्हणाली.

प्रिंस हॅरी आणि मेगनच्या शाही विवाहसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बनवण्यात आलेला हा केक आता खुद्द राजघराण्याची जोडपं पाहतं का, याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. लारा हा केक काही महिन्यांनंतर पार पडणाऱ्या एका प्रदर्शनात ठेवणार आहे. तोपर्यंत तो एका मोठ्या शीतपेटीत ठेवण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 8:44 am

Web Title: jumbo royal cake woman bakes life size cake of prince harry and meghan markle in six weeks see photo and video
Next Stories
1 फेकन्युज : सारेच ‘फेकू’जन!
2 फेकन्युज : अधिक पिकलेले केळे आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचा दावा खोटा
3 मुलगा दहावी नापास झाल्याचं वडिलांनी केलं जंगी सेलिब्रेशन !
Just Now!
X