२००७ मध्ये भारताच्या युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडला एकाच षटकात लागोपाठ सहा षटकार ठोकून विक्रम केला व केवळ १२ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. युवराज सिंगने एका षटकात ३६ धावा वसूल केल्या होत्या, पण अफगाणिस्तानमधील एका फलंदाजाने एका षटकात तब्बल ३७ धावा वसूल केल्या आहे.

शारजाहमध्ये सुरू असलेल्या सामन्यात अफगानिस्तानचा आक्रमक फलंदाज हजरतुल्लाह जजईने १७ चेंडूत ६२ धावांची विस्फोटक खेळी केली. अफगानिस्तान प्रीमियर लीग (APL)मध्ये हजरतुल्लाह जजईने एका षटकात सलग सहा षटकार लगावले. हजरतुल्लाह जजईने फक्त १२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. काबुल जवाननकडून फलंदाजी करताना हजरतुल्लाह जजईने बल्क लेजंड्सच्या एका गोलंदाजाला एका षटकात सहा षटकार लगावले.

बल्क लेजंड्‌सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात २४४ धावांचा डोंगर उभा केला. ख्रिस गेलने ४८ चेंडूत १० षटकारांसह ८० धावांची वादळी खेळी केली. २४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हजरतुल्लाह जजईने डावाच्या चौथ्या षटकांत अब्दुल्ला मजारीला सलग सहा षटकार लगावले. अब्दुल्ला मजारीने या षटकांत तब्बल ३७ धावा दिल्या. जजईने आक्रमक फलंदाजी करताना १२ चेंडूत ५० धावा करत जलद अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांच्या विक्रमाची बरोबरी केली. जजईच्या आक्रमक फलंदाजीनंतरही काबुल जवानन संघ निर्धारित २० षटकांत सात बाद २२३ धावांपर्यंत मजल मारता आली. संघाला २१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

या खेळाडूंनी एका षटकात लगावले सहा षटकार –
युवराज सिंह
ख्रिस गेल
गॅरी सोबर्स
रवी शास्त्री
हर्शल गिब्स
एलेक्स हेल्स
रविंद्र जाडेजा
मिसबाह उल हक