भारतात कधी काय होईल हे सांगणे खरंच अवघड आहे. वेगवेगळ्या धर्माचे देव आणि त्याचे कर्मकांड यांबाबत मैलामैलावर पद्धती बदलतात. देवावर श्रद्धा असणारे भक्त त्या देवाला आवडणारा प्रसाद देतात हे आपण नेहमीच पाहतो. प्रत्येक देवांना वेगवेगळा नैवैद्य चढवला जातो आणि मंदिरात येणा-या भाविकांसाठी तो प्रसाद म्हणून दिला जातो. त्यामुळे भारताच्या प्रत्येक मंदिरात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद मिळतील. गणपती बाप्पाला मोदक, हनुमानाला तेल तर काही भागात देवीपुढे जनावरांचा बळी दिला जातो. याशिवाय कधी देवाला दारु तर कधी बर्गरचा प्रसाद देण्यात आल्याच्या बातम्याही आपण वाचल्या असतील. मात्र आता ही गोष्टी वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. याचे कारण म्हणजे एका देवीला नूडल्सचा प्रसाद दिला जातो.

कोलकातामध्ये तांग्रा येथे असणाऱ्या चायनिज काली मंदिरामध्ये देवीला चविष्ट नूडल्स आणि चॉप्सी याचा प्रसाद देण्यात येतो. हे मंदिर म्हणजे याठिकाणी राहणाऱ्या चायनिज आणि हिंदू लोकांच्या एकीचे उत्तम प्रतिक आहे. काली पूजेच्या दिवशी या दोन्ही समाजातील लोक एकत्र येत देवीची पूजा करतात. यादिवशी पहाटेपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते. यामध्ये सर्वांना फुले, फळे, पुजेचे सामान, प्रसाद असे आणण्याची जबाबदारी देण्यात येते. त्यानंतर आयोजित केल्या जाणाऱ्या प्रसादामध्ये भक्तांना नूडल्स, चॉप्सी आणि भाज्या घातलेला भात देण्यात येतो.

हे मंदिर ६० वर्षे जुने असून काळ्या दगडामध्ये कोरलेले आहे. १२ वर्षांपूर्वी मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला आणि ग्रॅनाईटचा वापर करुन हे बांधकाम करण्यात आले. याठिकाणी मागितलेल्या इच्छा पूर्ण होतात असा येथील स्थानिकांचा अनुभव आहे. याआधीही चैन्नईमधल्या जया दुर्गा पीठात भक्तांना प्रसाद म्हणून ब्राऊनी, बर्गर, सँडविच, चेरी टॉमेटो सॅलॅड दिले जात आहे. देवाला आवडणारा प्रसाद दिल्यास तो आपल्याला पावतो असा समजही या भक्तगणामध्ये रुढ झालेला दिसतो. त्यामुळे भारतात अशा प्रकारच्या गोष्टी घडताना दिसतात.