नोटाबंदीच्या काळात एटीएममध्ये पैसे नसल्यानं सामान्य नागरिकांचे अक्षरश: हाल झाले होते. ८ नोव्हेंबर २०१६च्या रात्री पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा ‘कागज का टुकडा’ असतील असं पंतप्रधान मोदींनी जाहीर केलं. त्यानंतर पुढचे काही दिवस सामान्य लोकांना जो त्रास सहन करावा लागला हे अद्यापही कोणी विसरले नाही. अक्षरश: लोक पैशांसाठी तासन् तास एटीएमच्या रांगेत उभे होते.

आता ही परिस्थिती देशाच्या काही भागात पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी एटीएममध्ये पैसेच नाहीत. ज्या एटीएममध्ये पैसे आहेत तिथे लोकांच्या लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या कानपूरमधल्या काही दुकानदारांनी अनोख्या पद्धतीनं विरोध दर्शवला आहे. एटीएमबाहेर दुकानदारांनी निषेध करत एटीएमची पूजा केली, इतकंच नाही तर आरतीदेखील म्हटली. या अनोख्या पद्धतीनं केलेल्या निषेधाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. २०१६ मध्ये अनेक ठिकाणी अशाच प्रकारे नागरिकांनी विरोध केला होता. त्यांनी फूल, हार वाहून एटीएमटी पूजा केली होती.