कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसे खोटय़ा बातम्यांचे पेव अधिकच फुटू लागले आहे. कर्नाटक मुख्यमंत्री कार्यालय आणि गुप्तचर खात्यांमध्ये झालेल्या पत्रव्यवहाराचा हवाला देत ‘द स्टेट’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेला निवडणूकपूर्व निकाल खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. १२ मे रोजी कर्नाटकात निवडणुका होत आहेत. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या सूचनांच्या आधारे गुप्तचर यंत्रणांनी केलेल्या अंतिम सर्वेक्षणात काँग्रेसला ८५ ते ८९ जागा तर भाजपला ६६ ते ७५ जागा मिळतील असे भाकीत करण्यात आले आहे. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या कागदपत्रावर अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुप्तचर) यांची स्वाक्षरी आहे आणि ते मुख्यमंत्री कार्यालयाच्या पत्त्यावर पाठविण्यात आले आहे. मात्र राज्याच्या गुप्तचर खाते प्रशासनाचे पोलीस उपअधीक्षक बी. एस. शांताकुमार यांनी निकालाशी संबंधित प्रसिद्ध झालेली कागदपत्रे खोटी असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, गुप्तचर खात्याचे अतिरिक्त महासंचालकपद सध्या रिक्त आहे. या प्रकरणी हळसुरू पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून याचा तपास सुरू आहे. समाजमाध्यमांवर कोणीतरी खोडकरपणा केला आहे.

मध्यंतरी सिद्धरामय्या यांना चामुंडेश्वरी मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचा सल्ला देणारे गु्प्तचर विभागाचे बनावट पत्र समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ झाले होते.