भारतामध्ये केवळ प्रतिभा किंवा चमकदार कामगिरी लोकांनी डोक्यावर घेण्यासाठी पुरेशी नसते, तर त्यासाठी एक वेगळाच करीश्मा लागतो. कुठल्याही कोचिंग क्लासमध्ये शिकवलं जाऊ शकत नाही असं व्यक्तिमत्त्व लोकांच्या मनात घडावं लागतं आणि त्याचबरोबर नशीबाचाही वरदहस्त लागतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रतिभा वगळता यापैकी काहीही पदरात न पडलेला दिनेश कार्तिक त्यामुळेच दिग्गजांना हेवा वाटेल अशी कामगिरी करतो, तरीही चर्चा होते दुसऱ्यांचीच!
आजचंच उदाहरण बघा ना? काल रात्री शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना कार्तिकनं षटकार मारला आणि भारताला बांग्लादेश विरोधात विजय मिळवून दिला. शेवटच्या दोन षटकांमध्ये 34 धावा हव्या होत्या. 19 चेंडूंमध्ये 17 धावा करणाऱ्या विजय शंकरला बॉल सापडत नव्हता आणि भारतानं सामना गमावल्यात जमा होता. परंतु दिनेश कार्तिकनं अवघ्या आठ चेंडूंमध्ये 29 धावा फटकावत बांग्लादेशच्या तोंडातून विजयाचा घास काढून घेतला. सगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये दिनेश कार्तिकची चर्चा सुरू होती. परंतु गुगल ट्रेंडमध्ये आज सकाळी कार्तिकपेक्षा जास्त सर्च करण्यात आलेला क्रिकेटपटू होता विराट कोहली. विराट कोहली तर कालच्या सामन्यात संघातही नव्हता, परंतु विराट कोहली हा वर म्हटल्याप्रमाणे करीश्मा ल्यालेला खेळाडू आहे आणि क्रिकेट म्हटलं की कार्तिकच्या पराक्रमापेक्षा विराट कोहलीची खबरबात काढण्यातच भारतीयांना रस होता.

गंमत म्हणजे कालच्या सामन्यात महेंद्र सिंग ढोणीही नव्हता, परंतु जवळपास गुगलवर दिनेश कार्तिकएवढाच सर्च झालेला खेळाडू म्हणजे महेंद्रसिंग धोनी. अजूनही धोनीचा करीश्मा अबाधित असून तो क्रीडारसिकांना भुलवतोय याचंच हे लक्षण. महेंद्रसिंग धोनीच्या जबरदस्त कामगिरीमुळे त्याच्याच एवढा प्रतिभावान असलेला दिनेश कार्तिक गेली 14 वर्ष अडगळीत होता, कारण एका सामन्यात एकच यष्टीरक्षक असू शकतो. तरीही जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा कार्तिकनं संधीचं सोनं केलंय, यास अपवाद आहे एका सामन्याचा जेव्हा श्रीलंकेविरुद्ध खेळताना कार्तिकनं भोपळा फोडण्यासाठी 19 चेंडू घेतले होते. हा एक नकोसा विक्रमच त्याच्या नावावर आहे. याआधी भोपळा न फोडता 17 चेंडू खेळून बाद होण्याचा विक्रम एकनाथ सोलकरच्या नावे होता.

लायकी असूनही केवळ त्याच तोलामोलाचा आणि करीश्मा असलेला खेळाडू संघात असला की काय होतं, याचं जितंजागतं उदाहरण म्हणजे कार्तिक असं म्हणायला हरकत नाही. असाच एक आपला सडलेला खेळाडू म्हणजे पद्माकर शिवलकर. जेव्हा भारताचं फिरकीपटू असलेलं त्रिकूट क्रिकेट गाजवत होतं, त्या चंद्रा, बेदी व प्रसन्नाच्या सावलीत पॅडी शिवलकरचं रोप भारतीय क्रिकेटमध्ये रुजलंच नाही. चंद्रा, बेदी व प्रसन्ना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आणि पॅडी शिवलकरांनी स्थानिक क्रिकेटमधूनच क्रिकेटला राम राम ठोकला.

त्यामानानं कार्तिक नशीबवान. आयपीएलमुळे त्याच्यातला गुणी क्रिकेटपटू नजरेसमोर राहिला आणि त्याला किमान ढोणी निवृत्त झाल्यामुळे संधी मिळाली, जिचं तिनं सोनं केलं. भारतानं जिंकलेल्या 1983 च्या वर्ल्ड कपच्या संघामध्ये सुनील वॉल्सन नावाचा गोलंदाज होता. गमतीचा भाग असा की संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये त्याला एकाही सामन्यात खेळवलं नव्हतं. त्यामुळे वर्ल्ड कपच्या विजयामध्ये त्याचा एक अंशही वाटा नाही, परंतु भारतानं जिंकलेल्या पहिल्या वर्ल्ड कपच्या संघातला खेळाडू म्हणून तो आजतागायत मिरवला जातो. तो वर्ल्डकपचा मॉमेंट सुनील वॉल्सनची उर्वरीत आयुष्याची बेगमी आहे, ओळख आहे.

दिनेश कार्तिक कदाचित यापुढेही खेळेल, नवे विक्रम रचेल, परंतु बांग्लादेशच्या विरोधात निदहास ट्रॉफीच्या फायनलमध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून देणारा क्षण कार्तिकची ओळख ठरणार आहे, त्याला तो क्षण आयुष्यभर साथ देणार आहे.

तरीही, केवळ करीश्म्याची फोडणी नसल्यामुळे भारतीयांचं प्रेम त्याच्या वाट्याला किती येईल सांगता येत नाही. जर गुगलच्या रिलेटेड क्वेरीजचा संदर्भ द्यायचा तर आज सकाळीही नेटिझन्सना कार्तिकपेक्षा त्याच्या बायकोत रस जास्त होता. दिनेश कार्तिकच्या पहिल्या बायकोनं निकितानं कार्तिकला सोडलं आणि मुरली विजयशी संसार थाटला. नंतर दिनेश कार्तिकनं स्क्वॅशची खेळाडू दीपिकाबरोबर लग्न केलं. दुर्देवानं कालच्या पराक्रमानंतरही गुगलवर रिलेटेड क्वेरीजमध्ये दिनेश कार्तिकपेक्षा जास्त चौकशी चाललीय त्याच्या बायकोचीच!
(सगळे ग्राफ्स गुगल ट्रेंडवरील आहेत)

– योगेश मेहेंदळे
yogesh.mehendale@loksatta.com

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kartik won match for india but talked players are kohli and dhoni
First published on: 19-03-2018 at 13:58 IST