धावत्या ट्रेनसमोर जीव धोक्यात घालून स्टंट करणाऱ्या काश्मिरी मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री उमर अबद्दुला यांनी ट्विटरवर शेअर करून अशा स्टंटबाजीवर कडाडून टीका केली आहे. जीव धोक्यात घालून अशी स्टंटबाजी करणं म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे अशा शब्दात त्यांनी स्टंटबाजीचा निषेध केला आहे.

व्हिडिओमधील तरुणाची ओळख पटू शकली नाही. पण हा तरूण रेल्वेरुळावर झोपला होता. त्याच्या अंगावरून ट्रेन गेली पण यात आपल्याला काहीच झालं नाही हे या तरुणाला दाखवायचं होतं. या तरुणासोबत असणाऱ्या मुलानं हा व्हिडिओ शेअर केला, तेव्हापासून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जगभरातील अनेक तरुणांमध्ये रोमांचकारी आणि जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करण्याची क्रेझ वाढत चालली आहे. यातून झटपट प्रसिद्धी मिळते म्हणून अनेक तरुण आपल्या जीवाची पर्वा न करता जोखीम उचलतात. गेल्यावर्षभरात स्टंटबाजी करून पैसे कमावणाऱ्या स्टंटमनचे जीव गेल्याचेही अनेक उदाहरणं जगभरात पाहायला मिळाले आहेत. तरीही स्टंजबाजीचे भूत अनेकांच्या डोक्यातून गेलं नाही आणि काश्मीर मधला हा तरुण या गोष्टीला अपवाद नाही.

‘प्रत्येक गोष्टीत रोमांच शोधणारे हे लोक नक्कीच चुकीच्या मार्गावर आहेत, या तरुणाच्या निव्वळ मूर्खपणावर विश्वास ठेवणं मला कठीण जात आहे’ असं ट्विट करत उमर यांनी या कृतीचा विरोध केला आहे. दरम्यान या मुलाला शोधून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.