जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द करणे आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण करणे, या मोदी सरकारच्या ‘काश्मीर धोरणा’वर लोकसभेने मंगळवारी शिक्कामोर्तब केले. या निर्णयामुळे जम्मू काश्मीरला भारतातील सर्व कायदे आणि नियम लागू होणार आहे. विशेष दर्जा काढून घेतल्याने भारतीयांना जम्मू काश्मीरमध्ये जमीनीचे व्यवहार करण्याचा मार्ग खुला झाला आहे. मात्र आता सोशल मिडियावर भारताच्या इतर राज्यातील तरुणांना काश्मीरी तरुणांबरोबर लग्न करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अशा संदर्भातील पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. इंग्रजी लेखिका प्रेरणा बक्षी यांनी याच मुद्द्यावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील तरुणांवर निशाणा साधला आहे. “तुम्ही घृणास्पद असल्याने काश्मीरी तरुणी तुमच्याशी लग्न करत नाहीत,” असं प्रेरणा यांनी सुनावलं आहे.

अनुच्छेद ३७० रद्द केल्याने काश्मीरी मुलींशी लग्नाचा मार्ग मोकळा झाला आहे अशा अनेक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर प्रेरणा यांनी ट्विटवरुन संघाच्या स्वयंसेवकांवर जळजळीत टिका केली आहे. “प्रिय संघ स्वयंसेवक काश्मीरी मुली तुमच्याशी लग्न न करण्यासाठी कलम ३७० किंवा इतर कोणतेही कारण नसून त्यांच्या या निर्णयामागे केवळ एक कारण आहे. ते कारण म्हणजे, इतर महिलांप्रमाणे काश्मीरी महिलांना तुम्ही घृणास्पद वाटता,” असं ट्विट प्रेरणा यांनी केलं आहे. त्यांच हे ट्विट प्रचंड व्हायरल झालं असून अनेक संघ समर्थकांनी प्रेरणा यांच्यावर टिका केली आहे.

संघ समर्थक टीका करत असतानाच प्रेरणा यांनी मात्र आपण आपल्या भूमिकेशी ठाम असल्याचे म्हटले आहे. “तसेच एखाद्या काश्मीरी मुलीबरोबर संघाच्या स्वयंसेवकाचे लग्न झाले तर ते आई वडिलांच्या दबावामुळे जुळवून आणलेले लग्न असेल. कोणत्याही योग्य मनस्थितीच्या महिलेला तुमच्याशी लग्न करायला आवडणार नाही”, असं प्रेरणा दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.

दरम्यान या विषयावरुन प्रेरणा यांच्या ट्विटवर वाद सुरु असतानाच भाजपा आमदार विक्रम सैनी यांनीही एका जाहीर कार्यक्रमामध्ये काश्मीरी मुलींवरुन केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. “देशातील मुस्लिमांनी आता आनंदी असले पाहिजे. कारण मनात कुठलीही भिती न बाळगता ते आता गोऱ्या काश्मिरी मुलींसोबत लग्न करु शकतात”, असे वक्तव्य सैनी यांनी केले आहे.