गेल्या महिन्याभरात वरुण राजाचं रौद्र रुप केरळवासीयांनी पाहिलं. ‘देवभूमी’ म्हणून ओळखलं जाणारं स्वर्गाइतकंच सुंदर राज्य पूरामुळे गेले तीन चार दिवस पाण्याखाली गेलं. जगभरातून मदतीचे हात केरळवासीयांच्या मदतीला पुढे सरसावले. खालसा एड् या सेवाभावी संस्थेचे स्वयंसेवकही माणूसकीच्या नात्यानं केरळवासीयांच्या मदतीला धावले. ओणमसाठी या स्वयंसेवकांनी मंदिर साफ करून चकाचक केलं आहे. त्यांच्या या मदतीसाठी केरळवासीयांनीही त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पुरग्रस्तांसाठी अन्न आणि इतर प्राथमिक सेवा पुरवण्याचं काम हे सेवक करत आहेत. पुराचं पाणी ओसरल्यानंतर खालसा स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकांनी केरळमधल्या चर्चची स्वच्छता करायचं काम हाती घेतलं. गेल्या आठवड्यात ओणम सण पार पडला. ओणमनिमित्त मंदिरात भाविकांची दर्शनाला रिघ लागते. मात्र पुराचं पाणी आणि चिखलानं पनायन्नूर मंदिर पूर्णपणे अस्वच्छ झालं होतं. त्यामुळे मंदिराच्या एका सेवेकऱ्यानं स्वयंसेवकाकडे मदत मागितली.

मंदिराचा परिसर पूर्णपणे पुराच्या पाण्यामुळे, चिखलामुळे अस्वच्छ झाला होता. सेवेकऱ्यानं मंदिराचे फोटो स्वयंसेवकांना दाखवले आणि मदतीची विनंती केली. रविवारी स्वच्छता मोहीमेला सुरूवात झाली दिवसभर राबून त्यांनी हे मंदिर स्वच्छ केलं. स्वयंसेवकांनी केलेल्या मदतीमुळे केरळवासीयांनी या सर्वांचे आभार मानले आहेत.