‘देवभूमी’ केरळवर निसर्गाची अवकृपा झाली. निर्सगाच्या कोपानं सारं काही डोळ्यांदेखत गेलं. कोणाची घरं उद्धवस्त झाली, कोणाची आयुष्यभराची कमाई, शेती वाहून गेली तर कोणाच्या जवळच्या व्यक्तींचा बळी गेला. इतक्या भीषण परिस्थितीचा सामना हे राज्य करत असलं तरी इथल्या लोकांनी कमालीचा संयम दाखवला आहे. या कठीण काळात आपल्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक व्यक्तींच्या उपकरांची जाण ठेवत हे लोक कृतज्ञता व्यक्त करत आहेत.

सध्या केरळमधल्या सरकारी शाळेतला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुरामुळे डोक्यावरचं छत हरवलेली हजारो लोक इथल्या सरकारी शाळेत आश्रय घेत होती. पुराचं पाणी थोडं ओसरल्यानंतर या लोकांच्या राहण्याची सोय दुसरीकडे करण्यात आली. चार दिवस इथे लोक राहत होते. मात्र निघताना इथल्या प्रत्येकानं शाळेचे वर्ग अगदी स्वच्छ केले आणि मगच दुसरीकडे गेले. शाळेनं आपल्याला राहायला जागा दिली, त्यामुळे ती अस्वच्छ सोडणं योग्य नव्हतं म्हणून या शाळेतून निघणाऱ्या शेवटच्या व्यक्तीनं देखील जागा चकचकीत स्वच्छ केली आहे.

काँगोरपिल्ली सरकारी शाळेतील हा फोटो पुरग्रस्तांच्या मदतीसाठी असलेल्या स्वयंसेवक गोपीनाथ पारायील यांनं शेअर केला आहे. शाळेच्या चौथ्या मजल्यावर गेल्या काही दिवसांपासून १२०० लोकांनी आसरा घेतला होता. मात्र प्रत्येकानं निघताना कृतज्ञता व्यक्त करत ही जागा पूर्वीसारखीचं स्वच्छ केली.

देशांतील स्वच्छ राज्यांपैकी एक केरळ गणलं जातं. इथली साक्षरताही सर्वाधिक आहे. अशाही परिस्थितीत यांनी केलेलं वर्णन नक्कीच अनुकरणीय आहे.